रस्तालुटीतील तीन आरोपी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

नगर - बुऱ्हाणनगर रस्त्यावर काल रात्री अकरा वाजता दहा हजारांची रस्तालूट करणाऱ्या तिघांना सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या पथकाने चार तासांत जेरबंद केले. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना तीन दिवस पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. आरोपींमध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

युवराज नानासाहेब सपकाळ (वय २५ रा. गवळीवाडा, भिंगार), श्‍याम अंकुश इंगळे (वय १९ रा. निंबोडी, ता. नगर) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत अण्णा दिलीप हजारे (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जनावरांचे खाद्य घेऊन जाणारे पिकअप काल रात्री पाथर्डी रस्त्याने जात असताना कॅंटोन्मेंट बोर्डाच्या नाक्‍याजवळ तिघांनी अडविले. चालकाला दम देऊन पिकअप बुऱ्हाणनगर रस्त्याला घेण्यास सांगितले. बुऱ्हाणनगर रस्त्यावर चालकाला धक्काबुक्की करून त्याच्याजवळील दोन हजार रुपये व दोन मोबाईल, असा सुमारे दहा हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. अवघ्या दहा मिनिटांत चालक हजारे यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाणे गाठले. 

गुन्हा दाखल होताच सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सोलापूर रस्ता, औरंगाबाद रस्ता, पुणे रस्त्यावरील गस्तिपथकांशी संपर्क करून नाकेबंदी केली. अखेर पोलिसांनी भिंगार कॅंटोन्मेंट परिसरात गस्त घातली असता बगीच्याजवळ मोकळ्या जागेत रात्री अडीच वाजता एक मद्यधुंद अवस्थेत तरुण सापडला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने रस्तालूट केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अन्य दोन साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून दोन मोबाईलसह रोख रक्कम जप्त केली. 

न्यायालयाने त्यातील दोघांना ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. तर, एक अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.