मृत्यूचे ‘एस’ वळण

मृत्यूचे ‘एस’ वळण

सातारा - पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी बोगद्याच्या पुढील बाजूस असलेले ‘एस’ वळणावर आज पहाटे पुन्हा मृत्यूने तांडव घातले. या ‘ब्लॅक स्पॉट’ने १८ कुटुंबांच्या जीवनात काळाकुट्ट अंधार केला. या अपघातामुळे या ठिकाणच्या मृतांच्या संख्येने शंभरी गाठली. एवढी कुटुंबे उद्‌ध्वस्त होऊनही जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आश्‍वासनांशिवाय काही करता आलेले नाही. त्यामुळे आणखी किती मृत्यू होण्याची वाट पाहणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पोटासाठी या राज्यातून त्या राज्यात फिरणाऱ्या गरीब, कष्टकरी कुटुंबांवर आज पहाटे काळाने घाला घातला. महामार्गाने विजापूरहून भोरकडे काही कुटुंबे टेम्पोतून निघाली होती. त्या वेळी ‘एस’ वळणावर झालेल्या अपघातात अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली. अपघातानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. सर्वांनी दु:ख व्यक्त केले. रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होईल. गाडीची स्थिती कशी होती, याचीही तपासणी केली जाईल. त्यानुसार दोषारोपपत्रही दाखल होईल. मात्र, प्रश्‍न आहे तो गेल्या नऊ वर्षांत सुमारे १०० जणांची आयुष्यरेषा संपवणाऱ्या या धोकायदायक ‘एस’ वळणाला संपवण्यात अपयशी ठरलेल्यांचा. एवढी कुटुंबे उघड्यावर पडली तरी, ज्यांना पाझर फुटला नाही, त्यांच्यावर काय कारवाई होणार आणि ‘एस’ वळण काढण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना होणार की नाही याचा. खंडाळा बोगद्याच्या पुढे असलेल्या धोकादायक ‘एस’ वळणावर गेल्या नऊ वर्षांत सुमारे १०० जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाला, महामार्ग प्राधिकरणाला याची जाणीव नाही, असेही नाही. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय गेला. त्यातून स्थापन झालेल्या समितीने हे वळण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर केले. तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजनाही सुचविल्या. मात्र, तात्पुरते व तुटपुंजे उपाय करण्यातच धन्यता मानली गेली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत अनेकदा पत्रव्यवहार झाला. आजवरच्या प्रत्येक अपघातानंतर हे घडत आले आहे. तरीही ठोस उपाययोजना झालीच नाही. त्यामुळे हलगर्जीपणाने वाहन चालविणाऱ्यांबरोबरच चुकीच्या पद्धतीने रस्ता तयार करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला गेला पाहिजे. तरच हे मृत्यूचे तांडव थांबू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

जाधवांनी केला होता गुन्हा दाखल 
घाटातील ‘एस’ वळणाच्या दुरुस्तीबाबत अनेकदा मुद्दा उपस्थित झाला आहे. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना होत नव्हती. खासगी निमआराम बसच्या अपघातानंतर खंडाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक श्रीधर जाधव यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. तसेच ठोस उपाययोजनांच्या आखणीला वेग आला होता. मात्र, चार वर्षांनंतरही त्या पूर्णत्वास गेलेल्या दिसत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com