...आणि धावती आराम बस पेटली!

...आणि धावती आराम बस पेटली!

कऱ्हाड - ‘‘गोव्याहून- कऱ्हाडसाठी गुरुवारी रात्री निघालो. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास प्रवासात गाढ झोपेत असताना आराम बसच्या चालकाने ‘प्रवाशांनो खाली उतरा’ असा जोराचा आवाज दिला. समोर पाहतो तर बसच्या समोरून धुराचा लोट येत असल्याचे दिसले. झोपेत असणारे अन्य प्रवाशी गाडीतून बाहेर पडण्यासाठी धावपळ करू लागले. बाहेर पडण्यासाठी दरवाजाकडे धावलो. एक वृद्ध प्रवासी महिला दरवाजात पडली होती. त्यांना उठवत बसबाहेर काढले. दरवाजातून कसाबसा जीव मुठीत घेऊन बाहेर पडलो. तोपर्यंत आगीने रौद्ररूप घेतले होते...’’ 

गोवा- कऱ्हाड प्रवासादरम्यान काल रात्री गगनबावड्याजवळ धावत्या आराम बसला आग लागून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. या बसमधून ‘सकाळ’चे कऱ्हाडमधील बातमीदार सचिन देशमुख प्रवास करीत होते. आगीच्या तांडवातून ते स्वतः आणि अन्य प्रवाशी कसेबसे बाहेर पडले. या दुर्घटनेचा वृत्तांत त्यांच्याच शब्दांत..  

बसमधून बाहेर पडल्यावर घड्याळात पाहिले, पहाटेचे तीन वाजले होते. उतरलेले ठिकाण नेमके कोणते, कोणत्या जिल्ह्यात, याबाबत काहीच समजत नव्हते. त्याच वेळी पाठीमागून उसाचे वाहन घेऊन आलेल्या एकाकडे चौकशी केली असता, त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील लोंगे गाव असल्याचे सांगितले. धुरात पडणाऱ्या ठिणग्यांमुळे आगीने रूप धारण केले. आग वाढतच होती. त्याचवेळी काही प्रवासी आत अडकल्याचे कोणीतरी ओरडून सांगितले. मात्र, आगीची धग वाढल्याने पुढे जायचे धाडस होत नव्हते. त्याचवेळी चालकाच्या बाजूला पाठीमागे काही अंतरावर असणाऱ्या आपत्कालीन दरवाजातून दोन ते तीन प्रवाशांनी उडी घेत जीव वाचवला. अन्य कोणी आत आहे, यासाठी बाहेरून काचेवर दगड मारले. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. मदतीसाठी नेमकी कोणाशी संपर्क साधायचा हे सूचत नव्हते. त्याच वेळी कऱ्हाड पोलिस ठाण्यात यापूर्वी पोलिस निरीक्षक म्हणून काम केलेले व सध्या पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील बी. आर. पाटील यांच्यांशी संपर्क साधला. त्यांना प्रकाराची माहिती देताच त्यांनी मोबाईलवर कोल्हापूर पोलिस नियंत्रण कक्षाला जोडून घेतले. नियंत्रण कक्षातून माझ्याकडून घटनेची माहिती घेण्यात आली. तोपर्यंत आराम बसच्या समोर लागलेली आग पाठीमागेपर्यंत पोचली होती. काही वेळातच कळे पोलिस ठाण्याचे हवालदार स्वप्नील साळवी व त्यांचे सहकारी घटनास्थळी आले. त्याअगोदर कोल्हापूर महापालिकेचा अग्निशमन बंबही दाखल झाला होता. पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. एका बंबातील पाणी अपुरे पडणार असल्याचे लक्षात येताच दुसरा बंब पाचारण करण्यात आला. दरम्यान, बसमध्ये पाठीमागच्या सीटवर एक प्रवाशी असल्याचे पथकातील कर्मचाऱ्याला दिसते. त्यानंतर त्याच्या पुढच्या सीटवरही एक जण असल्याचे आढळले. दोघेही आगीत जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले. कोल्हापूर पोलिस नियंत्रण कक्ष माझ्या संपर्कात राहून सातत्याने माहिती घेत होता. दरम्यान, गगनबावड्याचे पोलिस निरीक्षक संदीप भागवत, तसेच कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई घटनास्थळी आले. शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिकाऱ्यांनी बसमधील प्रवाशांना वाहनांची सोय करून कळे पोलिस ठाण्यात नेले. भयभीत प्रवाशांना ठाणे अंमलदारांनी चहा, बिस्कटांची सोय केली. काही वेळानंतर अधिकारीही तेथे दाखल झाले. त्यानंतर कोल्हापूरपर्यंत जाण्यासाठी वाहने थांबवून जाण्याची सोय करण्यात आली. श्री. पाटील, श्री. देसाई यांनी प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पैसे आहेत का, याचीही चौकशी केली.  

मृत्यूनेच त्यांना बोलावले...
प्रवास सुरू झाल्यापासूनच बसमध्ये मद्यपान, तसेच धुम्रपान करण्याच्या कारणावरून आराम बसमध्ये जळून मृत्युमुखी पडलेल्या दोघांशी अनेकदा चालक, वाहकाशी वाद झाला होता. बांदा येथे तपासणी केंद्रावर बस वाहकाने पोलिसांकडे त्यांची तक्रारही केली होती. त्यांच्याकडील बाटली जप्त करत तेथील पोलिसांनी दोघांना पोलिस ठाण्यात नेण्याचा सज्जड दम दिला. त्यावर ते विनंती करू लागल्याने त्यांना बसमध्ये बसण्यास परवानगी दिली. मात्र, काही अंतर पुढे गेल्यावर चालकाला पाठीमागच्या बाजूस सिगारेट पेटल्याने धूर आल्याचे सेन्सरद्वारे समजले. त्यामुळे त्याने बस थांबवून त्यांना खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्यांच्यासमवेतच्या अन्य युवकांनी विनंती केल्याने त्यांना बसू दिले. अखेर या दुर्घटनेत त्यांचाच मृत्यू झाल्याचे नंतर स्पष्ट झाले. दोन- तीन वेळा त्यांना बसमधून उतरवण्याचा प्रयत्न होऊनही ते न उतरल्याने मृत्यूनेच त्यांना बोलावून नेले, अशी हळहळ अन्य प्रवाशांनी केली. 

शरद पवार यांनी घेतली माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रात्री कऱ्हाडमध्ये आले होते. ‘सकाळ’चे बातमीदार सचिन देशमुख यांनी गगनबावडा अपघातात केलेल्या मदतीची माहिती आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांना दिली. श्री. पवार यांनी देशमुख यांना बोलावून या दुर्घटनेची सखोल माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com