कागद रंगवू नका, लोकांची कामे करा - सदाभाऊ खोत

कागद रंगवू नका, लोकांची कामे करा - सदाभाऊ खोत

इस्लामपूर - पाणीपुरवठा योजना, तसेच अवैध वाळू उपसा प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे दिले. बेकायदेशीर काहीही खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगत कागद न रंगवता लोकांची कामे करा, गरजूंपर्यंत लाभ पोचवा, असेही ते म्हणाले.

आमदार शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, गौरव नायकवडी, प्रांत राजेंद्रसिंह जाधव, तहसीलदार सविता लष्करे, गटविकास अधिकारी राहुल गावडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रमुख उपस्थित होते.

अपूर्ण पाणी योजना, योजनेत गैरकारभार करणाऱ्या समित्या यांचे अहवाल द्यावेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. एखादी तक्रार येण्याची वाट न पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना फौजदारी कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. वाळू उपसाप्रकरणी आदेश नसताना बोजा उतरवला गेला असेल तर असे अधिकारी निलंबित करून सर्वांवर गुन्हे दाखल करा. अनधिकृत सर्व साठे जप्त करा. आठवड्यात कारवाई झाली पाहिजे. जप्त साठ्याचा लिलाव करून जनतेला विका, अशा सूचना खोत यांनी केल्या. जिल्ह्यातील बाजार समिती जागेचा योग्य विनियोग झाला नसेल अशा कामांचा अहवाल देण्याच्या सूचना निबंधकांना खोत यांनी दिल्या. विजेच्या धक्‍क्‍याने मृत व्यक्ती व जळितामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईची काहीच तरतूद नाही. ७० लोक त्यापासून अलिप्त असल्याचे बी. जी. पाटील यांनी सांगितले. मंत्री खोत यांनी प्रस्ताव दाखल करण्याची व धोकादायक पोल बदलण्याची सूचना केली. अहिरवाडी येथील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेसाठी जास्त क्षमतेचा ट्रान्स्फाॅर्मर बदलून देण्याची मागणी केली. उच्च व जादा दाबाने पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री खोत यांनी सांगितले. महादेववाडी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जगन्नाथ माळी यांनी मांडला. इरिगेशनचे पाणी विहिरीत सोडा आणि आडवे येतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे खोत म्हणाले. पाणंद रस्ते कामाला मजूर उपलब्ध करून देण्याची मागणी बाळासाहेब घेवदे यांनी केली.

वाळवा पंचायत समिती इमारत बांधकामात चुकीचे खर्च दाखवल्याची तक्रार अरुण कांबळे यांनी केली.  गौरव नायकवडी यांनी पुनर्वसन वसाहतीतील समस्या मांडल्या. बी. जी. पाटील यांच्या तक्रारीवर मायक्रो फायनान्सचा एक रुपयाही देऊ नका, प्रांतांना भेटा, असे सांगत अनधिकृत वसुली रोखून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन खोत यांनी दिले. प्रा. एस. के. कुलकर्णी यांनी अर्थसंकल्पाचे विवेचन केले.

अधिकाऱ्यांवर ताशेरे...
मुद्रा कर्ज योजनेबाबत मंत्री खोत यांनी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, ‘‘मला माहितीय टार्गेट कसे पूर्ण करतात ते! मला ते नको आहे. गरजू लोकांचे काम झाले पाहिजे. विशेषतः ‘मुद्रा’सारख्या योजनांचे मेळावे घ्या, लोकांच्या तक्रारी जाणून घ्या. गरजूंना लाभ द्या. या सगळ्यातून मी गेलोय. मलाच कर्ज मिळाले नव्हते. हसण्यावारी नेऊ नका, गंभीर आहे। किमान लोकप्रतिनिधींना तरी माहिती देत जावा. इथे असणाऱ्यांना मेळाव्याचे विचारा म्हणजे समजेल. फक्त कागदावर रंगवारंगवी बंद करा.’’

‘मारून टाका, पण प्रश्न सोडवा...’
वाळूउपसा तक्रारीला दाद मिळत नसल्याची खंत बी. जी. पाटील यांनी मांडली. आमचा प्रश्न रास्त आहे, वाळूमुळे नदी, रस्ते, पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. सर्व अधिकाऱ्यांनी मिळून ठरवले तर प्रश्न सहज सुटेल. मला मारून टाकण्याच्या धमक्‍या येत आहेत, मी मेल्यावर प्रश्न सुटत असेल तर मारून टाका, पण प्रश्न सोडवा, अशी आर्त विनवणी बी. जी. पाटील यांनी केली. 

व्यासपीठावर ‘भाऊ’गर्दी
विविध कामांच्या पाठपुराव्यासंदर्भात आयोजित बैठकीत राजकीय नेते पुढे आणि अधिकारी मागे अशी स्थिती होती. ज्यांचा या विषयाशी काहीही संबंध नाही अशा ‘भाऊ’ समर्थकांचीही मोठी संख्या व्यासपीठावर होती. कोण कधीही उठत होते, कुणीही पुढे येऊन बसत होते इतकी बेशिस्त होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com