मिकी माउस, सीतेची आसव फुलांचा गालिचा; पर्यटकांचेही आगमन 

मिकी माउस, सीतेची आसव फुलांचा गालिचा; पर्यटकांचेही आगमन 

तारळे - तारळे व पाटणपासून 14 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निसर्गरम्य सडावाघापूर पठारावर निळ्या रंगाची सीतेची आसव, पिवळी सोनकी व मिकी माउस आदी प्रकारातील फुले फुलली आहेत. पिवळ्या मिकी माउसच्या, तर निळ्या रंगाच्या सीतेची आसव फुलांमुळे पठारावर पिवळा व निळा सडा पडल्याचा भास होत आहे. ही रंगांची उधळण पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची पावले सडावाघापूरकडे वळू लागलीत. 

कास पठाराच्या धर्तीवर सडावाघापूर पठारावरही काही प्रजातींच्या फुलांचा बहर दिसून येत आहे. त्यात निळ्या रंगाची सीतेची आसव, निळा तुरा असलेला स्मिथीया आगरकरी, पांढरे गेंद, पिवळी सोनकी व मिकी माउसची फुले उमललेली दिसतात. लांबलेल्या पावसामुळे फुलांवर काहीसा परिणाम झाला आहे. मात्र, आठ दिवसांपासून पाऊस थांबल्याने फुले बहरू लागली आहेत. सध्या निळ्या रंगाची सीतेची आसव, पिवळी सोनकी व मिकी माउसची फुले उमलली आहेत. त्यामुळे पठारावर पिवळा-निळा गालिचा पसरल्याचा भास होतो. या फुलांबरोबरच पिवळी व पांढऱ्या रंगाची रानफुलेही दिसून येतात. कासच्या तुलनेत येथील फुलांची वाढ कमी असते तसेच आकारही लहान असतो. येथील वातावरणही थंड व आल्हाददायक आहे. पावसाळ्यात दाट धुके, थंडगार वारे व खास आकर्षण असलेला उलटा धबधब्याचा थरार अनुभवयास पर्यटक भेट देतात. 

पुष्पसृष्टीच्या शास्त्रोक्त अभ्यासाची गरज 
स्थानिक लोकांची जनावरे या पठारावर चरतात. जनावरांच्या वर्दळीमुळे फुले पायाखाली तुडवली जातात. निसर्गप्रेमी येथील फुलांच्या बहरापासून अजूनही तितकेसे अवगत नाहीत. या बाबी लक्षात घेता येथे फुलांना पोषक वातावरण असले तरी त्याचा शास्त्रोक्त अभ्यास होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास येथेही पुष्पसृष्टीच्या वाढीला बळ मिळू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com