आमची लंगोट जाईल; तुमचे काय जाईल? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

इस्लामपूर - जिल्ह्यात कुणीही आमदार झाला की तो माझ्यामुळेच म्हणायची जयंतरावांना जुनीच खोड आहे. माझ्या मंत्रिपदासाठी शिफारस केल्याचे जयंतरावांचे उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असून वैतागलेल्या माणसाची ही आदळआपट आहे, अशी टीका पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. कालच श्री. पाटील यांनी सदाभाऊंना चिमटा काढताना ते मंत्रिपदासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करावी, अशी गळ घालण्यासाठी आले होते, असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर संतापलेल्या सदाभाऊंनी जयंतरावांवर प्रतिहल्ला केला. 

ते म्हणाले, ""जयंतराव तुम्हाला कार्यक्रम करायची सवय आहे. याद राखा आमचा फक्त लंगोट आहे, लंगोटच जाईल... तुमचे काय काय जाईल हे योग्य वेळी दाखवून देऊ. तुम्ही तुमच्या आणि आम्ही आमच्या जागेवर योग्य आहोत. संभ्रम निर्माण करण्याची ही कूटनीती थांबवा. लोक आता भुलणार नाहीत. त्यांच्या आशीर्वादाने मंत्री झालो असेन तर तुमचे अभिनंदन. मात्र, असेच प्रयत्न तुम्ही तुमच्या लोकांनी आमदार, मंत्री व्हावे म्हणून का करीत नाही? एवढेच वजन असेल तर ते दाखवून द्या. जिल्ह्यात कोणत्याही पक्षाचा आमदार निवडून आला तरी तो माझ्यामुळेच ही त्यांची खोड आहे. इस्लामपूरला बदल न रुचल्याने ते आदळआपट करीत आहेत. संभ्रमाचे हे त्यांचं तंत्र जुनंच आहे.'' 

ते म्हणाले, ""सत्ता कायम नसते हा सुविचार ऐकवण्यापेक्षा तो तुम्ही आधीच लक्षात ठेवला असता तर 15 वर्षांत राज्याचा कायापालट झाला असता. माझे मंत्रिपद कायम नाही, हे मला ठाऊक आहे; पण लोकशाहीत तुमच्यासारख्या प्रस्थापितांना घरी बसावे लागते, हे लक्षात ठेवा. सर्वसामान्य शेतकरीही मंत्री होऊ शकतो. राजकारणाचा सातबारा कायमस्वरूपी आपला नाही एवढे जरी माझ्या मंत्रिपदामुळे तुम्हाला समजले तरी खूप झाले.'' 

राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांचे जमते का?.. असा सवाल करून जयंतरावांनी डिवचले होते. त्यावरही मंत्री खोत यांनी कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, ""गेली 25 वर्षे काहीच नसताना आमच्या दोघांचे चांगले जमले. आता आमच्या पाठीमागे जनतेचा आशीर्वाद आहे. सरकार आमचे आहे, त्यामुळे यापुढची 25 वर्षेही आम्ही एकत्रच राहू. आमच्यात तेढ व्हावी, यासाठी तुम्ही देव पाण्यात घालून बसला आहात. मात्र, ते जमणार नाही. माझ्या कामाची पोचपावती मुख्यमंत्र्यांनी मला दिलीय. त्यामुळे स्वच्छता व पाणीपुरवठा ही आणखी दोन खाती त्यांनी मला दिली आहेत. त्यांनी आता सत्तेच्या माध्यमातून लोकांना वेठीस धरण्याचे दिवस संपल्याचे लक्षात घ्यावे. अपक्षाला उपनगराध्यक्ष करण्यासाठी पक्षाचा व्हिप काढावा लागला यातून त्यांचा नगरसेवकांवरचा वचक लक्षात येतो.'' 

पत्रकार बैठकीला नगराध्यक्ष निशिकांत पाटील, नगरसेवक विक्रम पाटील, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, प्रवक्ते भागवत जाधव, महेश खराडे उपस्थित होते.