सागर, तुझं जाणं साऱ्यांनाच निःशब्द करून गेलं...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

चटका लावणारी एक्‍झिट - पंचगंगा स्मशानभूमीत रंगकर्मी, तंत्रज्ञांनी फोडला हंबरडा

चटका लावणारी एक्‍झिट - पंचगंगा स्मशानभूमीत रंगकर्मी, तंत्रज्ञांनी फोडला हंबरडा
कोल्हापूर - सागर चौगुले... एक हरहुन्नरी आणि गुणी कलावंत. एखादी भूमिका समरसून कशी करायची, याचा एक आदर्श वस्तुपाठच. पण काल नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि त्याने ऑन स्टेजच कायमची एक्‍झिट घेतली. अख्खी रात्र जागून सारी मंडळी सकाळी आठच्या सुमारास सागरचे पार्थिव घेऊन कोल्हापुरात आली आणि तमाम कलाकार, तंत्रज्ञांनी  हंबरडा फोडला. सागरची ही मनाला चटका लावणारी एक्‍झिट साऱ्यांनाच निःशब्द करून गेली. दरम्यान, पंचगंगा स्मशानभूमीत आज सकाळी नऊच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. रक्षाविसर्जन उद्या (रविवारी) सकाळी आहे. 

येथील नाटक, चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रात सागर गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत होता. अनेक जाहिराती त्याने केल्या. चित्रपट-नाटकातल्या त्याच्या भूमिकाही गाजल्या. शहरातील सर्वच कला संस्थांशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध; मात्र नाटकात तो फक्त काळम्मावाडीच्या हनुमान नाट्य संस्थेच्या माध्यमातूनच काम करायचा. हनुमान नाट्य संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेत नेहमीच परिवर्तनाचा विचार मांडणारी नाटकं आणली आणि बक्षिसांची लयलूट केली. ‘हनुमान’च्या टीमचा तो तसा अविभाज्य भागच. सुरवातीच्या काळात काही एकांकिका त्याने केल्या आणि नाटकाच्या मुख्य प्रवाहात येताना ‘हनुमान’च्या टीमनेही त्याला बहुतांश वेळा लीड रोलच दिला. ‘धरणाखालच्या अंधारातून’, ‘लव्ह इथले भयकारी’ या नाटकांबरोबरच त्याचा सहभाग असलेल्या ‘सासू ४२०’, ‘गोंधळ मांडियेला’, ‘कथा नाम्या जोग्याची’ या तीनही नाटकांनी राज्य नाट्य स्पर्धेत प्राथमिक फेरीत कोल्हापूर केंद्रावर आणि नंतर अंतिम फेरीत पहिल्या क्रमांकासह अनेक बक्षिसे मिळवली. यंदाच्या स्पर्धेत याच टीमचे ‘अग्निदिव्य’ नाटक हृदयस्पर्श हौशी सांस्कृतिक संस्थेच्या वतीने सादर झाले आणि प्राथमिक फेरीतील यशानंतर अंतिम फेरीत पोचले. अंतिम फेरीतील प्रयोग काल पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात सुरू झाला आणि त्याच्या एंट्रीलाच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्याची भूमिका खुलून आली असतानाच हृदयविकाराचा झटका आला आणि तो स्टेजवरच कोसळला.  

तुला एंट्री मिळणार नाही...!
शुक्रवारी सकाळी टीम पुण्याकडे रवाना झाली. प्रवासात फार दगदग होणार नाही, याची खबरदारी सर्वांनीच घेतली होती. सुरवातीपासूनच एकमेकांची चेष्टामस्करी करीत सर्वांचीच ऊर्जा सकारात्मक ठेवण्यावर भर दिला. एरवी शांत असणारा सागरही कधी नव्हे ते या मस्करीत चांगलाच सहभागी झाला. पुण्यात पोचल्यानंतर त्याने एक तास विश्रांतीही घेतली. रात्री आठला प्रयोग सुरू होण्यापूर्वी एका सहकलाकाराला तो चेष्टेतच ‘‘कशाला एवढी गडबड करायला लागलायेस? मी तुला स्टेजवर एंट्री देणार आहे होय?’’ असे म्हणाला होता. या साऱ्या गोष्टींना आज उजाळा मिळाला.

Web Title: sagar chaugule exit