संभाजी पवार यांचा येत्या 28 रोजी सत्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

सांगली - माजी आमदार संभाजी पवार यांचा 28 मे रोजी सांगलीकरांच्या वतीने सर्वपक्षीय नागरी सत्कार होणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत तरुण भारत क्रीडांगणावर हा सत्कार सोहळा होईल. त्याच दिवशी महापौर चषक कुस्ती मैदान होत असून, त्यात पहिल्या क्रमांकाची कुस्ती तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवणारा विजय चौधरी याची पंजाबचा हिंदकेसरी मल्ल जेस्सा पट्टी याच्यासोबत होईल. नगरसेवक गौतम पवार यांनी ही माहिती शनिवारी दिली.

सांगली विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व केलेल्या संभाजी पवार यांनी तडफदार व अभ्यासू विरोधी आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवली. विशेषतः जनता दलात असताना पवार यांच्यासह व्यंकप्पा पत्की, शरद पाटील या सांगलीकर आमदारांनी सभागृह दणाणून टाकले होते. त्यांची ओळख सांगलीचे त्रिमूर्ती अशी होती. त्यांच्या या लढवय्या कारकिर्दीचा आढावा घेणारा "राजकीय पैलवान' हा चरित्रग्रंथही प्रकाशित करण्यात येणार आहे.