वाळू उपशामुळे नदीपात्र बदलतेय!

अशोक मुरुमकर
गुरुवार, 24 मे 2018

सोलापूर - पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी नदीमधील वाळूउपसा झाल्यानंतर चाळाचे ढीग नदीपात्रात पसरणे आवश्‍यक आहे. परंतु, अनेक ठिकाणी ते तसेच असल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर आल्यानंतर सीना नदीचे पात्र बदलते आहे, त्यामुळे शेजारच्या जमिनी वाहून जात आहेत. वाळू प्रमाणापेक्षा जास्त उचलल्याने खडक उघडे पडले असून, खड्ड्यांत गाळ साठत आहे.

नगर जिल्ह्यातून उगम पावणारी सीना नदी ही "भीमे'ची उपनदी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ या तालुक्‍यांतून येऊन दक्षिण सोलापूर तालुक्‍यात कुडल संगम येथे ती "भीमे'त मिसळते. बेसुमार वाळूउपशाने पात्राची स्थिती धोकादायक झाली आहे. 2010-11 मध्ये आळजापूर, खडकी, बाळेवाडी, बिटरगाव (श्री), पोटेगाव, करंजे, बोरगाव आदी ठिकाणचे वाळू लिलाव झाले होते. तेव्हा बेकायदा वाळूउपसा झाल्याने नदीत मोठे खड्डे झाले होते. भविष्यात धोका निर्माण होऊ नये यासाठी सरकारच्या नियमानुसार वाळूउपसा झाल्यानंतर उर्वरित चाळाने खड्डे बुजवणे आवश्‍यक होते; परंतु ते बुजवले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी नदीकिनाऱ्यावरच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. वेळीच लक्ष दिले नाही तर आणखी जमिनी वाहून जाण्याचा धोका आहे.

वाळूच्या चाळाचे ढीग पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरत असल्याने नदीचे पात्र बदलत आहे. बिटरगावच्या बाजूकडे वाळूच्या चाळाचे ढीग असल्याने तरटगावकडे नदीपात्र सरकले आहे.

वाळूउपशामुळे नदीचे पात्र खोल होते, त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढतो. ढिगांमुळे पाण्यास अढथळा होऊन नदीचा काठ कोरत जातो. त्यात किनाऱ्यावरची माती वाहून जाते. प्रवाहाला प्रतिरोध करणारी झाडेही वाहून जातात व शेतकऱ्यांच्या जमिनी खचण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे प्रावाहही बदलतो.
- डॉ. आ. गो. पुजारी, पर्यावरणतज्ज्ञ

Web Title: sand digging river problem