सांगलीच्या आखाड्यात तिरंगी-चौरंगी लढती 

sangali municipal corporation election
sangali municipal corporation election

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीचे काही प्रभागातील चित्र तिरंगी तर काही प्रभागात चौरंगी लढतीचे संकेत आहेत. मोठ्या रस्सीखेचीनंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे जुळले तरी सांगलीवाडीत आणि मिरजेतील एका प्रभागात दोन्ही काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत असेल. भाजपने सर्व 78 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत तर शिवसेनेने स्वबळाचा नारा पुर्ण करताना 51 जागांची उमेदवार यादी जाहीर केली. सर्व पक्षांना मोठी खेचाखेची करीतच उमेदवार निश्‍चितीचा पहिला टप्पा पार करावा लागला. आज अखेरच्या दिवशी सर्व पक्ष व अपक्ष मिळून सुमारे एक हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. 

दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचे काय याबद्दलची उत्सुकता आज दुपारी साडेबारापर्यंत कायम होती. ऐनवेळी यादी जाहीर करून भाजपमधील आऊटगोईंग रोखण्याची नेत्यांची व्युहनिती बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. काँग्रेस नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेचा घोळ सुरु ठेवताना सांगलीवाडी प्रभाग 13 व मिरजेतील प्रभाग 4 आणि 6 मध्ये मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय खुला ठेवला. तुलनेने दोन्ही काँग्रेसमधून भाजपमध्ये जितकी आऊटगोईंगची चर्चा होती तितके मात्तबर भाजपकडे गेले नसल्याचे दिसते. काँग्रेस नेत्यांनी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेत एकीने निवडणूक जिंकू असा निर्धार व्यक्त केला. भाजपने अखेरच्या टप्प्यात प्लॅन बी प्रमाणे उमेदवारी वाटप केल्याचे दिसते. सावंत बंधू वगळता राष्ट्रवादीतून कोणीही मात्तबर भाजपमध्ये गेले नाही. 

कुपवाडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम करीत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या धनपाल खोत प्रभाग एकमधून तर चिरंजीव महावीर यांना प्रभाग दोनमधून उमेदवारी पटकावण्यात यशस्वी झाले. मात्र पत्नी सुलोचना यांना ते उमेदवारी देऊ शकले नाहीत. उपमहापौर राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते पत्नी सविता यांच्यासह प्रभाग एक आणि दोन मध्ये उतरले आहेत. उपमहापौर विजय घाडगे यांनी कुपवाडमध्ये पवार गटाच्या स्वाभीमानी आघाडीसोबत सोयरीक करीत चार जागांवर उमेदवार उभे करीत लढण्याचा इरादा जाहीर केला आहे. 

नेत्या जयश्री पाटील यांनी उत्तम साखळकर यांची उमेदवारी निश्‍चित केल्याने खणभागातील प्रभाग 16 मधून महापौर हारुण शिकलगार यांची उमेदवारी संकटात आली होती. मात्र महापौरांनी आपला ज्येष्ठत्वाचा हातचा वापरत ओबीसी जागेवरील दावेदार राजेश नाईक यांचा पत्ता कापला. मदन पाटील यांचे निष्ठावान अशी ओळख असलेल्या नाईक यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम असला तरी ते माघार घेतील असे भाऊ गोटातून सांगण्यात आले. 

स्वाभीमानी आघाडीच्या विसर्जनाची निवडणूकीपूर्वी घोषणा करीत शतप्रतिशत शिवसेना अशी घोषणा करणाऱ्या गौतम पवार यांनी आघाडीचे पुनरुज्जीवन करीत गावभाग, कुपवाड, खणभाग, जामवाडीत एकूण 12 जागांवर उमेदवार उभे केरीत वेगळी चूल मांडली आहे. गौतम पवार यांनी स्वतः रिंगणातून माघार घेताना शिवराज बोळाज, बाळासाहेब गोंधळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या आशा शिंदे या प्रस्थापितांना उमेदवारी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com