सांगली शहरातील चौक कॅमेऱ्याच्या नजरकैदेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सांगली : बेदरकारपणे वाहने चालवून अपघाताला कारणीभूत ठरणे, वाहतुकीचे नियम तोडणे, वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे असे प्रकार करणाऱ्यांना आता यापुढे सावध व्हावे लागणार आहे. नियम तोडून रुबाबात जाणे, पोलिसांना न जुमानता वेगात जाणे अशांना आता कॅमेराच "शूट' करणार आहे. कारण शहरातील प्रत्येक चौकात आता मोठ्या क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे तुमच्यावर नजर ठेवून असणार आहेत. लवकरच याचे उद्‌घाटन होणार आहे. 

सांगली : बेदरकारपणे वाहने चालवून अपघाताला कारणीभूत ठरणे, वाहतुकीचे नियम तोडणे, वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे असे प्रकार करणाऱ्यांना आता यापुढे सावध व्हावे लागणार आहे. नियम तोडून रुबाबात जाणे, पोलिसांना न जुमानता वेगात जाणे अशांना आता कॅमेराच "शूट' करणार आहे. कारण शहरातील प्रत्येक चौकात आता मोठ्या क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे तुमच्यावर नजर ठेवून असणार आहेत. लवकरच याचे उद्‌घाटन होणार आहे. 

सुसाट जाणाऱ्या वाहनांमुळे शहरात वाढलेले रस्ते अपघात, चेनस्नॅचिंग, घरफोड्या, वाटमाऱ्या करुन पळून जाणारे गुन्हेगार, वाहतूक नियम तोडून वर पोलिसांवर गुरगुरणारे वाहनचालक या सर्वांना आळा घालण्यासाठी आता शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बनवण्यास प्रारंभ झाला आहे. गेले वर्षभर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत चर्चा सुरु होती. प्रमुख चौकात असे कॅमेरे बसवण्याची गरज निर्माण झाली होती. मात्र त्याची कार्यवाही होत नव्हती. शहरांसह सर्व पोलिस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत चर्चा झाली होती. त्यासाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून निधी देण्याची तयारी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी दर्शवली होती. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनीही शहरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना केली होती. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार नियोजन विकास निधीतून 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

सध्या शहरातील कॉलेज कॉर्नर, राजवाडा चौक, पुष्पराज चौक, कॉंग्रेस कमिटी, गारमेंट चौक, टिळक चौक या ठिकाणी असे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे या कॅमेऱ्यांची आता शहरातील सर्व हालचालींवर राहणार आहे. महापालिका क्षेत्रात हे कॅमेरे बसवण्यात येत आहेत. या कॅमेऱ्याचे मॉनिटरिंग थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात राहणार आहे. त्यामुळे कॅमेऱ्यात जे काही "शूट' होईल ते सरळ पोलिस अधीक्षक कार्यालयात थेट दिसणार असल्याने त्यावर पोलिसांचीही नजर राहणार आहे. जर काही घडल्यास त्याचा पुरावाच पोलिसांकडे उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांना एक शिस्त लागेल. 

शहराच्या प्रवेशद्वारावरही कॅमेरे 
शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवरही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामध्ये कोल्हापूरकडे जाणाऱ्या 100 फुटी रोडवर, माधवनगर, कर्नाळ रोडवर शिवशंभो चौक, लक्ष्मी मंदिर या ठिकाणीही कॅमेरे असणार आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातील, राज्यातील वाहने शहरात मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे शहरात येणाऱ्या वाहनांवरही नजर राहणार आहे. 

दंगलखोर, गुन्हेगारांवरही नजर 
शहरात बेदरकारपणे चालणाऱ्या वाहनांबरोबरच गुन्हेगार, दंगलखोर यांच्यावरही कॅमेऱ्याची नजर असेल. त्यामुळे पळून गेलेले गुन्हेगार किंवा दंगल माजवणारे समाजकंटक यांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधणे आता शक्‍य होणार आहे. गेल्या काही महिन्यात शहरात वाढलेल्या वाटमाऱ्या, घरफोड्या, चेनस्नॅचिंग या सारख्या प्रकारांनाही यामुळे आळा बसेल अशी आशा आहे. त्यामुळे यापुढे आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे हे सांगलीकरांना लक्षात ठेवावे लागणार आहे.

Web Title: Sangli City police installed CCTV