कॉंग्रेस बंडखोर ठाम, माघारीची फक्त चर्चाच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

सांगली - दोन माजी मुख्यमंत्र्यांनी खलबते केल्यानंतरही विधानपरिषदेच्या निवडणुकीतील कॉंग्रेसचे बंडखोर शेखर मानेंच्याकडून अधिकृत उमेदवार मोहनराव कदम यांना पाठिंब्याचा निर्णय अधांतरीच असल्याचे आज चित्र स्पष्ट झाले. बंडखोर उमेदवार शेखर माने यांना पाठिंबा जाहीर करण्यास भाग पाडावे, असा आदेश प्रदेशाध्यक्षांनी दिला खरा, मात्र नगरसेवक किंवा नेत्यांच्या पातळीवर याबाबत आज चर्चेपलीकडे काहीच झाले नाही. काल झालेल्या बैठकीतील हमरीतुमरीचे कवित्व मात्र आजही दिवसभर सुरूच होते. 

सांगली - दोन माजी मुख्यमंत्र्यांनी खलबते केल्यानंतरही विधानपरिषदेच्या निवडणुकीतील कॉंग्रेसचे बंडखोर शेखर मानेंच्याकडून अधिकृत उमेदवार मोहनराव कदम यांना पाठिंब्याचा निर्णय अधांतरीच असल्याचे आज चित्र स्पष्ट झाले. बंडखोर उमेदवार शेखर माने यांना पाठिंबा जाहीर करण्यास भाग पाडावे, असा आदेश प्रदेशाध्यक्षांनी दिला खरा, मात्र नगरसेवक किंवा नेत्यांच्या पातळीवर याबाबत आज चर्चेपलीकडे काहीच झाले नाही. काल झालेल्या बैठकीतील हमरीतुमरीचे कवित्व मात्र आजही दिवसभर सुरूच होते. 

सांगली-सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीत विशाल पाटील गटाचे नगरसेवक शेखर माने यांनी बंडखोरी केली आहे. ती मागे घेण्यासाठी अनेक नेत्यांनी शिष्टाई केली. मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दोन्ही गटांना समोर बोलावून चर्चा केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी उपस्थित होते. या बैठकीतील वादावादी म्हणजे कॉंग्रेसमधील जुनीच धुणी नव्याने बडवण्याचा प्रकार ठरला. विशाल पाटील यांनी कदम गटाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. पक्षाचे राजकीय निर्णय घेताना आपल्याला विश्‍वासात घेतले जात नाही. परस्पर निर्णय घेतले जातात. महापालिकेतही असेच घडत आले आहे, असा आरोप केला. पतंगराव कदम यांनी हा मुद्दा खोडून काढला. ते म्हणाले, ""पक्षात कोणाची इच्छा नसताना यांच्या गटाला उपमहापौरपद दिले आहे. मात्र यांनी स्वतंत्र गट स्थापन करून काय केले हे सर्वांना माहिती आहे'', असा आरोपही केला. 

यावर माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी लोकसभेचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ""लोकसभेला कडेगाव-पलूस मतदारसंघात कमी मते मिळतात. जिल्ह्यातीलही काहीजण आमच्या विरोधात काम करतात.'' 
पतंगरावांनी हा मुद्दाही खोडून काढला. ते म्हणाले, ""मोदी लाटेत गेल्यावेळी मताधिक्‍य घटले. लोकसभेला नेहमीच मताधिक्‍य दिले आहे. त्यापूर्वी एका निवडणुकीत काय झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. असले आरोप करून वेळकाढूपणा नको.'' तर विशाल पाटील यांनी, "आमच्याकडे आकडेवारी आहे', असा दावा करताच विश्‍वजित कदम यांनी "आमच्याकडेही तुमच्या कारभाराचे रेकॉर्ड आहे,' असा प्रतिहल्ला केला. उपमहापौर निवडीवेळी विश्‍वजित कदम यांनी उपमहापौर गटाच्या नगरसेवकांना वॉर्डात घुसून पराभूत करण्याबाबत केलेल्या विधानाची आठवण करून देऊनही वाद रंगला. प्रदेशाध्यक्षांसमोर असा दोन्ही बाजूंनी वाद-प्रतिवाद सुरू असताना अखेर श्री. चव्हाण यांनीच "वाद संपवायचा आहे की नाही' असा जाब विचारला. त्यावर मिटवायचा असल्याचे विशाल-प्रतीक पाटील बंधू म्हणाले. चव्हाण म्हणाले, ""उणी-दुणी काढायची वेळ ही नाही, असे सांगत माघार घेऊन पाठिंबा जाहीर करा.'' 

दरम्यान, बंडखोर उमेदवार शेखर माने यांची आजही कॉंग्रेस नेत्यांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही. माघारीबाबत श्री. माने यांच्याकडूनच कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने नेत्यांना चर्चापलीकडे काहीही स्थान उरलेले नाही. त्यांनी आज प्रमुख नगरसेवकांसोबत चर्चा केली. या चर्चेत माघार नाही असाच सूर उमटला. त्यामुळे बंडखोराच्या पाठिंब्याचा निर्णय अधांतरीच असल्याचे स्पष्ट झाले.