सांगली महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी अजिंक्‍य पाटील निश्‍चित

सांगली महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी अजिंक्‍य पाटील निश्‍चित

सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित झाली आहे. सत्ताधारी भाजपकडून स्थायी सभापतीपदासाठी त्यांचा एकच अर्ज दाखल झाला आहे. एकूण सात समित्यांपैकी सहा समित्यांवर भाजपचे वर्चस्व राहणार असून एक प्रभाग समिती कॉंग्रेसराष्ट्रवादी आघाडीला मिळणार आहे.

महापालिकेच्या समिती सभापतींची निवड येत्या शुक्रवारी (ता. 28) रोजी होणार आहे. त्यासाठी आज अर्ज दाखल करण्यात आले. महापालिकेत भाजपचे संख्याबळ 42 आहे. तर कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ 35 आहे. एक सदस्य स्वाभिमानी आघाडीचा आहे. स्थायी समितीच्या 16 सदस्यांमध्ये भाजपचे नऊ तर कॉंग्रेसचे चार आणि राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. त्यामुळे स्थायी समितीचे सभापतीपद भाजपकडेच राहणार हे निश्‍चित आहे.

भाजपकडून स्थायी समिती सभापतीपदासाठी सांगलीवाडीचे नगरसेवक अजिंक्‍य पाटील यांचे नाव कोअर कमिटीने निश्‍चित केले. त्यांचा एकमेव अर्ज आज दाखल करण्यात आला. त्यामुळे त्यांची निवड निश्‍चित आहे.

मिरजेला महापौरपद देतानाच भाजपच्या कोअर कमिटीने काही धोरणात्मक निर्णय घेतले होते. त्यानुसार मिरजेला महापौरपद आणि सांगलीला उपमहापौरपद दिल्याने स्थायी समिती सभापतिपदी सांगलीवाडीला देण्याचे निश्‍चित झाले होते. त्यामुळे अजिंक्‍य पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
भाजपचे नेते माजी आमदार दिनकर पाटील, नगरसेवक शेखर इनामदार, सुरेश आवटी यांच्यासह महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर तसेच सर्व नगरसेवक सकाळीच महापालिकेत दाखल झाले. त्यानंतर दुपारी
बाराच्या सुमारास सर्वांनी एकत्र जाऊन सभापतीपदांसाठी उमेदवारांचे अर्ज महापालिकेचे नगरसचिव के. सी. हळींगळे यांच्याकडे सुपुर्द केले.

समाजकल्याण समितीसाठी स्नेहल सावंत, महिला बाल कल्याण समितीसाठी मोहना ठाणेदार यांचे अर्ज दाखल करण्यात आले. तर प्रभाग समिती एकसाठी उर्मिला बेलवलकर, समिती दोनसाठी जगन्नाथ ठोकळे, तीनसाठी सोनाली सागरे आणि प्रभाग समिती चारसाठी शांता जाधव यांचे अर्ज दाखल करण्यात आले. भाजपकडून प्रत्येक सभापतीपदासाठी एकेकाच उमेदवारचे अर्ज दाखल करण्यात आल्याने प्रभाग समिती तीन वगळता इतर सर्वांच्या निवडी निश्‍चित आहेत.

प्रभाग समितीमधील नगरसेवकांच्या संख्याबळानुसार प्रभाग तीनमध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व आहे. इतर तीन प्रभागात भाजपचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे प्रभाग समिती तीन विरोधकांच्या ताब्यात जाणार हे निश्‍चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com