नोकरभरतीचा बंपर धमाका निवडणुकीनंतर 

नोकरभरतीचा बंपर धमाका निवडणुकीनंतर 

सांगली - जिल्हा बॅंकेतील रिक्त 455 कर्मचारी पदे भरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. आता ही भरती प्रक्रिया झेडपी पंचायती निवडणूक पार पडल्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती बॅंकेच्या प्रशासन विभागाने दिली. सांगली जिल्हा बॅंकेत गेली पंधरा वर्षे कर्मचारी भरती झाली नव्हती. त्यामुळे रिक्तपदांची संख्या वाढली आहे. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची आचारसंहिता संपल्यानंतर ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. 

जिल्ह्या बॅंकेच्या नोकरभरतीबाबत सहकार आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. सांगली, सातारा, पुणे, मुंबई, नगर, ठाणे, नाशिक, जळगावसह 11 जिल्हा बॅंकांनी कर्मचारी आकृतिबंध 20 मे रोजी शासनाला सादर केला होता. जिल्हा बॅंका आणि त्यांच्या या शाखांची आर्थिक उलाढालीनुसार अ, ब, क आणि ड असे वर्गीकरण करण्यात आले आहे. या वर्गीकरणानुसार कर्मचारी संख्या निश्‍चित केली आहे. यानुसार सांगली जिल्हा बॅंकेसाठी लिपिक व वर्ग तीन कर्मचाऱ्यांचा 1 हजार 442 पदांचा आकृतिबंध नाबार्ड व सहकार आयुक्तांना सादर केला होता. जिल्हा बॅंकेत सध्या 987 कर्मचारी कार्यरत तर 455 पदे रिक्त आहेत. अखेर सहकार आयुक्तांनी सांगली जिल्हा बॅंकेस नोकरभरतीसाठी मंजुरी दिली आहे. ही भरती आचारसहिंतेच्या आधी करण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक कारण पुढे करत ही आता निवडणुकीनंतर सुरू करण्यात येणार आहे. नव्याने भरती होणाऱ्या पदांमध्ये 31 शिपाई, 26 तांत्रिक अधिकारी, कर्मचारी व उर्वरित पदे लिपिकवर्गीय आहेत. 

दलाल झाले सक्रिय 

जिल्हा बॅंकेत मोठी बंपर नोकरभरती प्रक्रिया आचारसंहितेनंतर सुरू होणार आहे. संचालक मंडळ ही भरती प्रक्रिया पारदर्शी राबवणार असल्याचे छाती ठोक सांगत आहेत. मात्र याच संचालकांचे काही "दलाल' मात्र बॅंकेच्याच आवारात बसून भरतीचे आकडे मोड करताना दिसत आहेत. त्यांनी शिपाई ते लिपिक पदापर्यंतच्या "दराचे' आकडे फिक्‍स केले असल्याचेही बोलले जात आहे. 

या संस्थेकडून भरती प्रक्रिया 

आयबीपीएस, सीपॅक, एनआयबीईआर, हॅनीक्रॉम या चार राज्यस्तरीय संस्थांपैकी एका संस्थेमार्फत भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज मागवण्यापासून ते निवड यादी जाहीर करण्यापर्यंतची कार्यवाही संबंधित संस्थेमार्फत होणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com