सामूहिक बलात्कार करून शाळकरी मुलीचा खून 

sangli-murder
sangli-murder

भिलवडी - अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहक बलात्कार केल्यानंतर तिचा तोंड दाबून खून केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. येथील चोपडे मळ्याजवळ सकाळी संबंधित मुलीचा मृतदेह आढळला. 

पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या खुनाची गांभीर्याने दखल घेत तातडीने तीन उपअधीक्षक आणि पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली तीन स्वतंत्र पथके तपासासाठी नियुक्त केली आहेत पथकामार्फत आरोपींचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या खुनानंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ भिलवडी, अंकलखोप, माळवाडी व धनगाव येथे शनिवारी (ता. 7) ग्रामस्थांनी बंद पुकारला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - मृत मुलगी आई व बहिणीसह भिलवडीजवळील एका वाडीत राहते. तिच्या वडिलांचे दहा वर्षापूर्वी निधन झाले आहे. संबंधित मुलीची आई पलूस येथे कामाला जाते. बहीण शाळा शिकते. मृत मुलगी पंधरवड्यापासून शाळेला दांडी मारत होती. त्याबद्दल आईने तिला समजावले होते. त्यातून दोघींचा वाद झाला होता. गुरुवारी सायंकाळी ती शिवाजीनगर येथील बागेत खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. तिची लहान बहीण आजारी असल्याने आई तिला दवाखान्यात घेऊन गेली होती. 

रात्री आठ वाजता आई घरी आली; तेव्हा घराबाहेर खेळायला गेलेली मुलगी परतली. दोघींमध्ये शाळेला दांडी मारण्यावरून वाद झाला. तेव्हा मुलीने आईला "तू मला काही सांगू नकोस, मला कळते,' असे सुनावले. त्यानंतर गावातील मावसआजीच्या घरी झोपण्यासाठी जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली. ती नेहमीच आजीकडे जात असल्यामुळे आईनेदेखील फारसे विचारले नाही. 

दरम्यान, आज सकाळी चोपडे मळ्याजवळ रस्त्याच्या कडेला एका उकिरड्याजवळ मुलीचा मृतदेह पडलेला लोकांना दिसला. हळूहळू गर्दी जमू लागली. मुलीची ओळख पटल्यानंतर शेजाऱ्यांनी ही माहिती मुलीच्या घरी सांगितली. आई आणि बहिणीला धक्काच बसला. पोलिसपाटील अशोक तावदर यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात माहिती कळवली. भिलवडीचे सहायक निरीक्षक सुनील हारूगडे आणि पथक घटनास्थळी आले. सांगलीहून श्‍वान पथक पोचले; परंतु श्‍वान तेथेच घुटमळले. त्यामुळे संशयितांचा माग काढता आला नाही. पोलिसांनी मृतदेह सांगली सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवला. तेथून मिरज वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह पाठवला. तेथे विच्छेदन झाले. दरम्यान, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, इस्लामपूरच्या उपाधीक्षक वैशाली शिंदे, विटा येथील उपाधीक्षक अमरसिंह निंबाळकर आदींनी घटनास्थळी भेट दिली. श्री. हारुगडे यांनी त्यांना घटनेची दिली. 

एकापेक्षा जास्त आरोपी 
पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मिरज मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनाची माहिती घेतली. त्यानंतर सायंकाळी भिलवडी येथे घटनास्थळी भेट दिली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""सामूहिक लैंगिक अत्याचार करून संबंधित मुलीचा खून करण्यात आला आहे. तोंडावर टॉवेल, उशी किंवा कापड टाकून तोंड दाबल्यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाला आहे. लैंगिक अत्याचार अन्यत्र केल्यानंतर मृतदेह भिलवडी येथे आणून टाकल्याचे स्पष्ट होते. या खून प्रकरणात एकापेक्षा अधिक आरोपींचा सहभाग आहे. खुनाचा तपास करण्यासाठी तीन पोलिस उपअधीक्षक आणि शेजारील पोलिस ठाण्यांचे अधिकारी दाखल झाले आहेत. न्यायवैद्यक विभागातील तज्ज्ञांमार्फत शवविच्छेदन करण्यात आले आहे. तातडीने गुन्ह्याचा छडा लावला जाईल. या गुन्ह्याबाबत अफवा पसरवू नये.'' 

सोशल मीडियावर अफवा 
या प्रकाराची पोस्ट दुपारनंतर अनेकांच्या मोबाइलवर फिरत होती. पोलिसांनी एका समाजातील दोघांना अटक केल्याचे या "पोस्ट'मध्ये नमुद होते; परंतु पोलिसांनी उशिरापर्यंत आरोपींची नावे निष्पन्न झाली नसल्याचे सांगितले. काही संशयितांची चौकशी सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. 

पंचक्रोशीत बंद 
शाळकरी मुलीवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेचे परिसरात संतप्त पडसाद उमटले. अनेकांनी घटनेचा निषेध करून आरोपींना पकडण्याची मागणी केली. घटनेच्या निषेधार्थ भिलवडी, माळवाडी, अंकलखोप, धनगाव आदी पंचक्रोशीत शनिवारी गाव बंद पुकारण्यात आला आहे. 

मिरजेत महिला संघटनांची निदर्शने; पोलिस बंदोबस्तात शवविच्छेदन 
मिरज ः संबंधित मुलीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी मिरज शासकीय रुग्णालयात शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी केली. त्यानंतर सायंकाळी प्राथमिक अहवाल पोलिसांकडे दिला. त्यानुसार संबंधित मुलीचा मृत्यू श्‍वास गुदमरल्याने झाला आहे. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. 
शिवसेनेच्या सुनीता मोरे आणि अन्य महिलांनी शवविच्छेदनाचा अहवाल जाहीर केल्याशिवाय मृतदेह येथून हलवू देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. रुग्णालय परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला. काही काळ शवविच्छेदन विभागात मृतदेह होता. पोलिस आणि वैद्येकीय अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाबींची माहिती दिल्यानंतर मृतदेह भिलवडीकडे रवाना झाला. 

तत्पूर्वी दुपारी साडेतीन वाजता मृतदेह मिरजेच्या रुग्णालयात येताच रुग्णालय व्यवस्थापनाने तातडीने तिघा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडडून उत्तरीय तपासणी करण्यात येईल, असे जाहीर केले. तिघांपैकी एक अधिकारी परगावी असल्याने शवविच्छेदन चार वाजता सुरू झाले. तब्बल चार तास तपासणी चालली. तोपर्यंत काही महिला संघटनांनी रुग्णालयात अहवाल जाहीर करण्यासाठी घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी परिसरात तातडीने बंदोबस्त तैनात केला. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी महिला संघटनांच्या प्रतिनिधी स्वाती शिंदे, ऍड. तेजस्विनी सूर्यवंशी, ऍड. प्रवीणा हेटकाळे यांच्याशी चर्चा केली. रात्री आठ वाजता सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अहवाल दिल्यानंतर मृतदेह भिलवडीकडे नेण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com