मृत्यू सापळ्यात वर्षाला ४०० बळी

मृत्यू सापळ्यात वर्षाला ४०० बळी

रस्त्यांबाबत सर्व पातळीवर दुर्लक्ष - तिन्ही बांधकाम विभाग बेजबाबदार

सांगली - शहरात काल मध्यरात्री झालेल्या गंभीर अपघातात तीन तरुणांना प्राणाला मुकावे लागल्यानंतर पुन्हा एकदा रस्ते वाहतूक सुरक्षा चर्चेत आली आहे. रस्त्याची स्थिती, अतिक्रमणे, मद्यपान करून वाहन चालवणे, त्याकडे पोलिसांचे झालेले सोयीस्कर दुर्लक्ष, मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाची बेजबाबदार भूमिका या साऱ्या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करायला हवा. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ४०० लोकांना अपघातात प्राणाला मुकावे लागते आणि तितके लोक कायमचे अपंग होत आहेत.

रस्ते बांधकाम आणि त्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीविषयीची किमान संहिता पाळण्यात तिन्ही बांधकाम विभाग अपयशी ठरलेले आहेत. एक तर रस्त्याचे काम शास्त्रीय पद्धतीने होत नाही. त्याचे कित्येक नमुने सांगली शहराभोवती पाहायला मिळतील. अंकलीचा चौक, बायपास रोड चौक, मिरजेतील गांधी पुतळा, सांगली-पेठ रस्त्यावरील बहुतांश दुभाजक, तसेच कुपवाड रस्ता हे शहराला जोडणारे रस्ते अत्यंत धोकादायक बनले आहेत. काही रस्त्यांवर मधोमध खांब उभे आहेत. वळणाला पुरेशी जागा नसताना आयलॅंड बांधून अडचण केली आहे. पुष्पराज चौकातून सुरू होणारा आंबेडकर रोडवरील त्रिकोणी दुभाजक त्याचा आदर्श नमुना ठरेल. जिल्हाभरातील ही यादी खूपच मोठी आहे. अपघातांची मालिकाच सुरू असताना त्याविषयी तातडीने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे. धोकादायक वळण काढणे, पंक्‍चरबाबत दुभाजकांना बंद करणे, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई अशा पद्धतीने मोहीमच हाती घेण्याची आवश्‍यकता आहे. 

गुन्हे दाखल का होत नाहीत? 
खड्डा चुकवताना कोणाचा अपघातात मृत्यू झाला तर त्यासाठी संबंधित रस्त्याची जबाबदारी ज्या विभागाकडे आहे, त्यातील जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. कायद्यात तशी तरतूद आहे; मात्र पोलिसांच्या पंचनाम्यातून या गोष्टी गायब होतात. दुभाजक, गतिरोधकांपासून ते सूचना फलकांपर्यंत सारी जबाबदारी संबंधित विभागाची असते. ती पाळतील ते सरकारी कर्मचारी कसले?

अपघाताची प्रमुख कारणे
जिल्हाभरात प्रमुख रस्त्यांवरील चौकात अतिक्रमणे
रस्ता दुभाजकांबाबत नियमांची पायमल्ली 
रस्त्याकडेच्या झाडांना रंग किंवा रिफ्लेक्‍टरच नाहीत
गरज नसताना गतिरोधक, त्याला पांढरे पट्टे नाहीत
खड्डे चुकवताना मोठ्या प्रमाणात अपघात
धोकादायक वळण काढण्याबाबत चालढकल
सांगली-पेठसारखा रस्ता अपघाताचेच केंद्र
मिरज-पंढरपूर रस्ता वेगवान; मात्र सुरक्षा शून्यच
वाहन परवान्याची खैरात, चालकच धोकादायक

जिल्हाभरात आम्ही अपघात स्थळे लक्षात घेतली आहेत. त्या ठिकाणी सूचना फलक लावले आहेत. गतिरोधक केले आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी रस्ता दुभाजक फोडले आहेत. विशेषतः त्या ठिकाणी अपघात होताना दिसत आहेत. लोकांनी अशा पद्धतीने रस्त्याशी छेडछाड करू नये. जिथे दुभाजक तुटला आहे किंवा संपला आहे तेथे पथदिवा लावण्याबाबत सूचना दिल्या जातील. भविष्यात नवे मार्ग बनवताना यात सुधारणा होतील, अशी व्यवस्था आम्ही करू.
- डी. एस. जाधव, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

गेल्या वर्षभरातील अपघात
प्राणांतिक अपघात     ४०५
मृतांची संख्या     ४४४
जखमी संख्या     १५६
गंभीर अपघात     ३२५
गंभीर जखमी     ५२१
किरकोळ अपघात     १२४
किरकोळ जखमी    ११५

सांगली असुरक्षित
सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका वर्षात अपघातात तब्बल १६ जणांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे शहरातील रस्तेही सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होते. शहरात वाहतुकीचा वेग ५० किलोमीटरपेक्षा जास्त असू नये, असे फलक जागोजागी लावलेले आहेत. अर्थात त्याची पर्वा कुणीच करत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com