छे ! गोळीला कोण घाबरतोय? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

मी 30 वर्षे सैन्यात होतो. शिस्तीने जगलो, लढलो. आता माझा मुलगा सैन्यात आहे. सीमा सुरक्षा दलाचा तो सैनिक आहे. आमच्या घरात कधीही चिंतेचे वातावरण नसते. कारण, आम्ही गोळीला घाबरत नाही... सीमा सुरक्षा दलातील सैनिक अनुजित चौगुले (एरंडोली, ता. मिरज) याचे वडील बाबासाहेब रामचंद्र चौगुले "सकाळ'शी बोलताना भावना व्यक्त करत होते. 

सीमा सुरक्षा दलातील तरुणाच्या वडिलांची बोलकी भावना 

सैन्यात भरती झाल्यावर काही वर्षे जम्मू-काश्‍मीरमध्ये ड्युटी बजावावी लागते. भारत-पाक सीमेवर सदैव तणाव असल्याने काश्‍मीरमध्ये ड्युटीवर असणाऱ्या सैनिकांच्या घरात नाही म्हटलं तर एक चिंता दाटून राहिलेली असते. अनुजित तर थेट सीमा सुरक्षा दलाचा सैनिक. त्याला सदैव सीमेवर निधड्या छातीनं उभं ठाकायचं असतं. अशावेळी घरचं वातावरण कसं असतं? या प्रश्‍नावर बाबासाहेब म्हणाले,""छानच असतं की ! आम्ही घरी त्या विषयावर चर्चाच करत नाही. कारण, मी तब्बल 30 वर्षे सैन्यात होतो. अनुजितच्या आईला या गोष्टींची सवय आहे. अर्थात, एक आई म्हणून लेकाची काळजी असतेच, मात्र भीती नक्कीच नाही. लोक उगाच बाऊ करतात. सैन्यात गेला की गोळी लागेल अन्‌ काहीतरी होईल... असं नसतं काही. जो दक्ष आहे, सावध आहे, तो शत्रूला पुरून उरतो. मी अनुजितशी बोलताना नेहमी त्याच सूचना देत असतो. आम्हाला कधीच गोळीची भीती वाटत नाही.'' अनुजितनं ठरवलं असतं तर तो कोणत्याही क्षेत्रात करिअर करू शकला असता, मात्र बाबासाहेब यांनी त्याला सैन्यात जाण्यासच प्राधान्य दिले. मी केवळ नोकरी म्हणून सैन्यात गेलो नव्हतो, त्यामागे देशसेवेची भावना होती. तीच भावना, तोच वारसा आमचा अनुजित चालवतोय, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, असं त्यांनी आवर्जून सांगितलं. 

( शब्दांकन : अजित झळके)