कालव्याकाठची २५ हजार हेक्‍टर शेती संकटात

कालव्याकाठची २५ हजार हेक्‍टर शेती संकटात

सांगली  - ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील बागायती पिकांचा डोलारा संकटात आहे. जुलै संपायला आला तरी पावसाने ओढ दिल्यामुळे या पट्टयातील ऊस आणि काडी पक्व झालेली द्राक्ष बागायत धोक्‍यात आहे. आणखी १५ दिवस हीच स्थिती राहिल्यास उपसा सिंचन योजनांचे बटन दाबावेच लागेल, अशी स्थिती आहे. सध्या कृष्णा, वारणा नदीत पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पुरेसे पाणी असून ते सध्या कर्नाटकात वाहून जातेय. त्यामुळे योजना सुरू करण्यास पूरक स्थिती आहे.

जिल्ह्यात पावसाने अनपेक्षित दडी मारल्याने शेतीसमोरील संकटांच्या मालिकेत भर पडलीय. खरीप हंगाम हाती लागणार नाही, हे स्पष्ट आहे. फळबागा आणि कालवा क्षेत्रावर विस्तारलेल्या उसाला मोठा धोका निर्माण  झाल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती आहे. लाखोंची कर्जे उपसून डोलारा उभा केलेले शेतकरी धास्तावले आहेत. कालव्यातून पाणीपुरवठा बंद होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला. भूजलपातळी झपाट्याने खाली गेली. विहिरी, कूपनलिकांतून पाणी उपसून बागायत जगवणेही आता कठीण बनलेय. अशावेळी पुन्हा एकदा कालव्यातून पाणी सोडणे, हाच पर्याय समोर येतोय. 

ऊस महागात
ताकारी, म्हैसाळ, टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केलीय. द्राक्ष, बेदाणा बाजार गडगडल्याने सुरक्षित पीक म्हणून उसाला प्राधान्य दिले आहे. आता ते संकटात सापडले आहे. उसाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असून नेमक्‍या वाढीच्या काळात पाण्यात कपात करावी लागत असल्याने उत्पन्नावर मोठा परिणार होणार आहे.

बंधाऱ्यांनी बचाव
ताकारी, म्हैसाळ योजनेच्या टापूतील ओढ्यांवर गेल्या तीन-चार वर्षांत बहुतांश ठिकाणी दोन-तीन किलोमीटर अंतरावर बंधारे बांधलेत. तेच पिण्याच्या पाण्यासाठी  कामी येताहेत. बंधाऱ्यालगत पाणी मुरल्याने पाणी पातळी टिकलीय. अन्यथा कालवा काठावरील विहिरी, कूपनलिकांनी केव्हाच तळ गाठलाय. मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, तासगाव पट्टयात एकसारखी स्थिती आहे.

म्हैसाळ, ताकारी;अडचणीच अनंत
ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडा, अशी मागणी होतेय. योजनेचे सुमारे २५ कोटींचे वीजबील थकले आहे. दोन वर्षांपूर्वी टंचाई काळात सरकारी हमीवर योजना चालली, मात्र बीलाचे वांदे कायम आहे. मोठी थकबाकी असताना आता पुन्हा पाणी दिले जाण्याची शक्‍यता कमी आहे. शिवाय, पंपांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम याच टप्प्यात होणार असल्याने तांत्रिक अडचणीही उभ्या राहण्याची शक्‍यता आहे.

विहिरी, कूपनलिका अगदी तळाला गेल्या आहेत. म्हैसाळ योजनेला पाणी नाही. द्राक्षाच्या काड्या पिकल्या आहेत. आता पुरेसे पाणी लागणारच. जुलै संपत आला. ऑगस्टमध्ये पाऊस कमी आहे, असे सांगितले जातेय. त्यामुळे पिके संकटात आहेत. भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अधून-मधून चळक आणि ऊन याचा तो परिणाम आहे. भुरीग्रस्त बागा संकटात आहेत.
- अनिकेत घुळी, द्राक्ष बागायदार, मालगाव

नदीत पाणी आहे, पण...
कोयना धरणात साठा - ४७.२७ टीएमसी 
(गतवर्षी याचवेळी ४९ टीएमसी)
 वारणा धरणात साठा - १९.०७ टीएमसी 
(गतवर्षी याचवेळी २२.४८ टीएमसी)
 कृष्णा नदीतून विसर्ग - आयर्विनजवळून - ६५०० क्युसेक
 वारणा नदीतून विसर्ग - ५००० क्‍युसेक
 म्हैसाळ बंधाऱ्याजवळ विसर्ग - ११५०० क्‍युसेक
 राजापूर बंधाऱ्यावरून कर्नाटकात पाणी - ३० हजार क्‍युसेक
 कृष्णा, वारणा नदीत पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे पाणी वाहते
 म्हैसाळ, ताकारी योजनेतून पाणी उपशाला पूरक स्थिती

योजनांवरील पीक क्षेत्र -
म्हैसाळ - 
 द्राक्ष - ६००० हेक्‍टर 
 ऊस - ५००० हेक्‍टर
 इतर बागायती - ४००० हेक्‍टर

ताकारी -
 द्राक्ष - १००० हेक्‍टर
 ऊस - ६००० हेक्‍टर
 इतर बागायत - ३००० हेक्‍टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com