अजितदादा कडाडले, राष्ट्रवादीत 'मेजर ऑपरेशन'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

सांगली: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली दौऱ्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले. या जिल्ह्यात पक्षांतर्गत एक, दोन, तीन, चार गट असल्याचं मला सांगितलं गेलं. असलं चालणार नाही. इथं एकच गट पाहिजे, तो राष्ट्रवादीचा. जमत असेल तर बघा, अन्यथा पदावरून बाजूला व्हा. तेही जमत नसेल तर मला "मेजर ऑपरेशन' करावं लागेल, असा सज्जड दम त्यांनी दिला. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्यासमोर यांनी पक्षांतर्गत कुरघोड्यांना तडाखा दिला.

येथील माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये आज दिवसभर राष्ट्रवादीच्या विविध सेलसोबत अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे संवाद साधत आहेत. त्याच्या प्रमुख सत्रात अजितदादांनी "मी सांगलीचा पक्का गृहपाठ करून आलोय', याची प्रचिती दिली. राष्ट्रवादीत शहरमध्ये दोन गटांत तर जिल्ह्यात जयंतराव आणि दिवंगत आर. आर. पाटील गटात सातत्याने व जाहीरपणे खटके उडत आले आहेत. त्याबद्दल अजितदादांकडे वेळोवेळी तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत त्यांनी आज सर्वच पदाधिकाऱ्यांना फटकारले.

ते म्हणाले, ""मी आज आलोय, भाषण करून निघून जाईन, पुन्हा काही केलं तरी चालतयं, अशा भ्रमात कुणी राहू नका. या घडीपासून पुढे प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतला जाईल. ज्याला काय सांगायचं आहे, त्यानं खुशाल सांगा. मी, तटकरे, जयंतराव आम्ही त्यात विचारपूर्वक दुरुस्त्या करू. त्यानंतर इथे एकच गट असला पाहिजे. ज्याला जमत नसेल त्याने पद सोडावे. त्याला मी पक्षातून काढणार नाही, कार्यकर्ता म्हणून काम करा, मात्र गटतट करणारे पदावर नकोत. हे महिला, युवक, युवती या साऱ्यांसाठी लागू आहे. त्यातूनही सुधारणा झाली नाही तर नाविलाजास्तव तुम्हाला पदावरून बाजूला करावे लागेल.''

ते म्हणाले, ""या तालुक्‍याचा तो नेता भाजपमध्ये गेला, आता तेथे काही कामच नाही, असे सांगायचे बंद करा. जे कुणी उरलेत त्यांनी कामाला लागा. तुमच्यातून आपण उद्याचा आमदार, जिल्हा परिषद सदस्य तयार करू.''