निराधारांना भाकरी देणारे शिक्षण द्यावे - जिल्हाधिकारी काळम-पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

सांगली -  निराधार मुलांना पुस्तकातील ज्ञानापेक्षा संस्कारांची अत्यंत आवश्‍यकता आहे. दहावीनंतर पदवी मिळवून देणाऱ्या शिक्षणाकडे पाठवू नका, त्यांना भाकरी मिळवून देणारे शिक्षण द्या, असे मत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी व्यक्त केले. 

सांगली -  निराधार मुलांना पुस्तकातील ज्ञानापेक्षा संस्कारांची अत्यंत आवश्‍यकता आहे. दहावीनंतर पदवी मिळवून देणाऱ्या शिक्षणाकडे पाठवू नका, त्यांना भाकरी मिळवून देणारे शिक्षण द्या, असे मत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी व्यक्त केले. 

येथील दादूकाका भिडे बालसुधारगृहात ऑपरेशन ख्रिसमस चाईल्ड संस्थेतर्फे मुलांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. त्या वेळी जिल्हाधिकारी भावनिक झाले. काही मुलांशी वन-टू-वन संवाद साधून त्यांना चांगल्या सुविधा मिळतात का, हे समजून घेतले. या मुलांसाठी खूप काही करण्यासारखे आहे, आपण सारे मिळून त्यांना हात देऊ, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘अमेरिकेतील काही मुले खाऊच्या पैशांत बचत करून अन्य देशांतील मुलांसाठी खेळणी, भेटवस्तू पाठवितात, यामागे मानवतेचा मोठा संदेश दडलेला आहे. दिवाळीत आपणही हा संदेश घेऊन काम केले तर अशा अनेक निरागस चेहऱ्यांवर हास्य फुलविता येईल. जगातील सर्व धर्म मानवतेचाच संदेश देतात. त्याच दृष्टिकोनातून या निरागस मुलांकडे पाहताना त्यांच्यावर उत्तम संस्कार गरजेचे आहेत. त्यांना पुस्तकी शिक्षणातून जगण्याची कला मिळणार नाही. ती आपण जाणीवपूर्वक दिली पाहिजे. त्यांना भक्कमपणे उभे करण्यास प्राधान्य देऊया. दहावीनंतर त्यांना औद्योगिक प्रशिक्षण द्या. त्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक वाढीसाठी सुयोग्य नियोजन करा.’’

संस्थेचे जिल्हाप्रमुख शीतल लोंढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील आठ हजार मुलांना या भेटवस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. गेली सात वर्षे उदात्त हेतूने काम सुरू आहे.’’ अधीक्षक पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत केले. चर्चचे फादर अशोक लोंढे, सविता मनवानी, चार्ल्स नवगिरे, रवी पन्हाळकर, प्रमोद सौंदाडे, श्रीमती डुबल, श्रीमती काझी आदी उपस्थित होते.