दुसऱ्या हप्त्यासाठी जिल्ह्यात तापणार वातावरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

साखर दर घसरल्याने चिंता - कारखानदारांची ३०० देण्याची तयारी, तरीही शांतता

सांगली - साखर कारखान्यांना नवीन हंगामाचे वेध लागले तरी गेल्या वर्षीच्या दुसऱ्या बिलाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते आहे. कऱ्हाडच्या सह्याद्री साखर कारखान्याने ३१०० रुपये देऊन सर्वांची कोंडी करून ठेवली आहे. 

साखर दर घसरल्याने चिंता - कारखानदारांची ३०० देण्याची तयारी, तरीही शांतता

सांगली - साखर कारखान्यांना नवीन हंगामाचे वेध लागले तरी गेल्या वर्षीच्या दुसऱ्या बिलाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते आहे. कऱ्हाडच्या सह्याद्री साखर कारखान्याने ३१०० रुपये देऊन सर्वांची कोंडी करून ठेवली आहे. 

सांगली जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने दुसऱ्या बिलासाठीच्या हालचालीही सुरू केलेल्या नाहीत. साखरेच्या दरातील घसरण पाहता साखर कारखाने दुसरा हप्ता किती देतात, हे महत्त्वाचे आहे. साखर कारखानदार दुसरा हप्ता ३०० त्यातील  १५० रुपये दिवाळीला देण्याची तयारीत असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर गुप्त चर्चाही सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या हप्त्यासाठी शेतकरी संघटनांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, अशी चिन्हे आहेत. 

सन २०१६-१७ च्या हंगामाची सांगता होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. आता कारखान्यांना नवीन हंगामाचे वेध लागले आहेत. यंदाही साखर कारखानदारांसमोर उसाची स्पर्धा अटळ आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर, श्री दत्त व शरद या तीन कारखान्यांनी तातडीने १५० आणि दिवाळीला १५० रुपये असा तीनशे रुपये दर जाहीर केला. सह्याद्रीनेही दर जाहीर केला. मात्र सांगली जिल्ह्यातील एकही कारखान्याने दर जाहीर केलेला नाही. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील १२.५ टक्के उताऱ्याला किमान यंदा ३६०० रुपये दर मिळायला हवा, अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. त्यात पुन्हा रंगराजन समितीच्या शिफारशीप्रमाणे ७०ः३० की ७५ः२५ फॉर्म्युला काही शेतकरी संघटनांना मान्य आहे. त्यामुळे यंदा साखरेचे दर तेजीत असतानासुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात ३०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल, अशी चिन्हे नाहीत. 

उसाचं दुसरं बिल काढण्याची घाई करू नका. आधीच राज्य सरकारच्या सरसकट पण तत्त्वतः कर्जमाफीचा निर्णय होऊ द्या, त्यानंतर ठरवू, अशी सूचना शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांना केली आहे. त्यामुळे कारखानदारांत ‘फिल गुड’ आहे. जिल्ह्यात यावर्षी ५० लाख ५१ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. पैकी १३०० कोटींहून अधिकची बिले अादा करण्यात आली आहेत. ही पहिली उचल होती. ‘हुतात्मा’ने सर्वाधिक २८००, राजारामबापूने २७९० रुपये पहिली उचल काढली आहे. दुसऱ्या उचलीचे वारे वाहत आहे. शेतकरी संघटनांनी प्रतिटन किमान ५०० रुपयांची उचल मिळावी, अशी मागणी केली आहे. कारखानदारांनी त्याची तयारी केली आहे.