नोटबंदीचा फायदा चीनला - भुपेंद्रसिंह हुड्डा

अजित झळके
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

सांगली - केंद्र सरकारच्या नोटबंदीचा फायदा चीनला झाला आहे. भारतातील लघु उद्योग मोडून पडले. छोटे व्यापारी, उद्योजक देशोधडीला लागले. त्या तुलनेत चीनहून आयात वाढली, असा आरोप हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुड्डा यांनी येथील कॉंग्रेसच्या जनआक्रोश आंदोलनात केला. 

येथील विश्रामबाग परिसरतील नेमिनाथनगर कल्पद्रुम क्रीडांगणावर सुमारे पंधरा हजाराहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कॉंग्रसेने "भाजपचा परतीचा प्रवास' सुरु झाल्याचे आणि काँग्रेसला पुन्हा "अच्छे दिन' येत असल्याचे भव्य चित्र निर्माण केले. 

श्री. हुड्डा म्हणाले, ""नोटबंदीनंतर उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकली अन्‌ भाजपला वाटले हा नोटबंदीवर शिक्कामोर्तब आहे. पण, आज एक वर्षानंतर त्यातील दाहक वास्तव समोर आले आहे. आता दिल्ली सरकार जाणार हे नक्की आहे. कारण, शेतकरी, कामगार, शेतमजूर, सामान्य नागरिक साऱ्यांचे वाटोळे झाले आहेत. शेतमालाला भाव नाही. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळाची तुलना करा, मग कळेल भाजपने काय वाट लावली आहे. वीज, पेट्रोल दरातील वाढ आणि शेतमालाच्या दरातील घसरणीमुळे अर्थव्यवस्थेला दणका बसतोय.'' 

महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश म्हणाले, ""नरेंद्र मोदी आणि अमित शहा हा देश विकायला निघाले आहेत. आता सावध व्हा, भूलथापांना बळी पडू नका. भाजप हटवा, देश वाचवा.''

व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार पतंगराव कदम, मोहनराव कदम, सतेज पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजीत कदम  उपस्थित होते.