लाचखोरांना आता पोलिस कोठडीची हवा

घन:श्‍याम नवाथे
बुधवार, 19 जुलै 2017

सांगली - लाचप्रकरणी अटक केल्यानंतर तत्काळ दुसऱ्या दिवशी जामिनावर मुक्त होऊन मोकाट फिरणाऱ्या लाचखोरांना आता पोलिस कोठडीची हवा खाऊनच मग जामीन मिळणार आहे. 

सांगली - लाचप्रकरणी अटक केल्यानंतर तत्काळ दुसऱ्या दिवशी जामिनावर मुक्त होऊन मोकाट फिरणाऱ्या लाचखोरांना आता पोलिस कोठडीची हवा खाऊनच मग जामीन मिळणार आहे. 

लाचखोरांना अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडी न मागता थेट पोलिस कोठडीची मागणी करण्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला निर्देश मिळालेत. त्यानुसार जिल्ह्यात महिन्यात पाच केसमध्ये सातजणांना पोलिस कोठडीत मुक्काम करावा लागला. पोलिस ठाण्यात दाखल दैनंदिन गुन्हे आणि लाचप्रकरणी दाखल होणारे गुन्हे यात फरक आहे. ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांना अटक करून पुरावे शोधावे लागतात. मात्र लाचप्रकरणात गुन्हा दाखल होण्यापूर्वी जवळपास सर्वच पुरावा गोळा केला जातो. लाचप्रकरणात पुरावे गोळा करून आरोपींना अटक केली जात असल्यामुळे दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करताना पोलिस कोठडी कशासाठी मागायची? असा प्रश्‍न तपास अधिकाऱ्यांपुढे असायचा. त्यामुळे आरोपीला न्यायालयीन कोठडीची मागणी केली जायची. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तत्काळ जामीन मंजूर होऊन लाचखोर मुक्त होत असत. परंतु हे चित्र आता बदलले आहे. लाचखोरांना किमान एक दिवस का होईना पोलिस कोठडीची हवा खाऊनच बाहेर यावे लागत आहे.

लाचप्रकरणी अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयासमोर हजर करताना तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी अधिकारी करीत आहेत. त्यासाठी  त्यांना निर्देश आहेत. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार चंद्रकांत किल्लेदार, पोलिस नाईक बाळासाहेब मगदूम यांना नुकतीच पोलिस कोठडी मिळाली. त्यानंतर जतचा वैद्यकीय अधिकारी डॉ. हबीब नदाफ, जात पडताळणी दक्षता समितीकडील पोलिस निरीक्षक राजन बेकनाळकर त्याचा चालक दत्तात्रय  दळवी, काल अटक केलेला सागावचा मंडल अधिकारी समीर पटेल, आज पहाटे अटक केलेला वाहतूक पोलिस विनोद कदम यांना लाचप्रकरणात पोलिस कोठडीची हवा खावी लागली.

लाचखोरांपर्यंत पोहोचला संदेश
लाचप्रकरणात एखाद्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो थेट मुक्त होत असे. त्यामुळे नागरिकांतून आश्‍चर्य व्यक्त व्हायचे. लाचखोरांना कायद्याचा थोडातरी धाक  असण्याची आवश्‍यकता होती. लाचप्रकरणाचे शंभरहून अधिक खटले प्रलंबित आहेत. निकाल लागून पुढे केव्हा तरी शिक्षा होईल. परंतु आता लाच घेतल्यानंतर कोठडीत थोडा काळ तरी मुक्काम करावा लागेल असा संदेश लाचखोरांपर्यंत निश्‍चित पोहोचला आहे.

टॅग्स