विरोध केलात तर ‘विनयभंग’ची धमकी

विरोध केलात तर ‘विनयभंग’ची धमकी

‘आम्ही वैतागलोय... बायका, मुलींना अपार्टमेंटमध्ये फिरणं अवघड झालंय.. विरोध केला तर चक्क विनयभंगाची तक्रार दाखल करू, अशी धमकी दिली जातेय. नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं दिवसभर पुरुष बाहेर असतात... मागे काही होईल, अशी सतत भीती राहते. वधू-वर केंद्राच्या नावाखाली इथं काय चालतं माहिती नाही, मात्र त्यानं जीणं हराम केलंय...’ उत्तर शिवाजीनगरमधील ‘त्या’ अपार्टमेंटमधील काही फ्लॅटमालक ‘सकाळ’शी बोलत होते. 

वधू-वर केंद्राच्या नावाखाली उत्तर शिवाजीनगरमध्ये चालणाऱ्या ‘शंकास्पद’ उद्योगाचा पोलखोल करताना अनेक बाबी समोर येत आहेत. इतका सारा धूर उठल्यानंतरही आज ते केंद्र सुरू होतं. काही मुली आणि एक मुलगा त्या काऊंटरला होता. नाव नोंदवायचं आहे, असं सांगितल्यावर ‘सोमवारी या, सर नाहीत’, असा प्रतिसाद मिळाला. जेव्हा या केंद्राच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न  केला, तेव्हा अनेक शंकास्पद बाबी समोर येताहेत. रहिवाशांनी तक्रारींचा वाढा वाचला. 

वधू-वर केंद्र जिथं चालतं, तो फ्लॅट कुणाच्या  मालकीचा, याचा आम्ही शोध घेतला. त्यातून धक्कादायक आणि काहीशी संशयास्पद माहिती हाती लागली. एका कंपनीच्या नावे हा फ्लॅट आहे. कंपनी परजिल्ह्यातील आहे. अशा संशयकल्लोळ माजवणाऱ्या वधू-वर सूचक केंद्राला हा फ्लॅट का दिला... बरं, दिला इथंपर्यंतही ठीक... पण अपार्टमेंटमधील सर्वच्या सर्व फ्लॅटधारकांनी अनेकदा तक्रार करूनही ही कंपनी केंद्राशी भाडेकरार (?) का वाढवते. त्यांना पाठीशी का घालते... इथे पाल चुकचुकायला लागते. या केंद्रात या कंपनीचा थेट संबंध आहे का? की कंपनीपर्यंत या गोष्टी पोहोचतच नाहीत? अशा अनेक शंका इथल्या लोकांच्या मनात घर करून आहेत. या व्यवस्थापनाला अनेकदा लोकांनी निर्वाणीचा इशारा दिला होता. त्याला तो धजला नाही. 

या प्रवृत्तीला विरोध करायचा तर आमची ताकद पोहोचत नाही, अशी रहिवाशांची अडचण. आता त्यांना ताकद द्यायला पोलिस यंत्रणा पुढे येतील का? अपार्टमेंटमधला प्रत्येकजण म्हणतो, हे आताच थांबलं पाहिजे. त्यांचे अनुभव वाईट आहेत. या कंपनीने परस्पर अपार्टमेंट परिसरात सीसीटीव्ही लावले होते. याचे नियंत्रण ह्यांच्या फ्लॅटमध्ये. इथल्या महिलांना वावरणे कठीण होऊन  बसले होते. त्याला विरोध केल्यानंतर कॅमेरे काढून टाकण्यात आले.

जिल्ह्यात अनेक वधू-वर सूचक केंद्र आहेत, मात्र असे प्रशस्त आणि आलिशान केंद्र परवडते कसे? हा प्रश्‍न फारच गुंतागुंतीचा आहे. फ्लॅटधारकांनी या प्रकाराला विरोध केल्यानंतर वकिलांमार्फत नोटीस बजावण्यात आली. लोकांवर दबाबतंत्र वापरले गेले. अनेकदा इथे काम करणाऱ्या मुलींचा रहिवाशांसोबतचा वावर भीतीदायक असतो, असाही अनुभव काहींनी सांगितला. आता फ्लॅटधारकांमार्फत थेट पोलिस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे रहिवासी अपार्टमेंट असताना येथे व्यावसायिक वापर केला  जातोय, ही बाब शासकीय यंत्रणेने लक्षात घेतली तर हकालपट्टी करणे सोपे होईल, असेही काहींनी सुचवले. अर्थात, पोलिसांनी दखल घेतली नाही तरी इथले नागरिकच आता त्याचे उच्चाटन करण्याच्या मन:स्थितीत आहेत. 

संकेतस्थळावरही भामटेगिरी
या वधू-वर सूचक केंद्राच्या संकेतस्थळालाही भेट दिली. एका क्षणात ‘बोगस’ ठरवता येईल, असे संकेतस्थळ असून वधू म्हणून मॉडेल्सचे फोटो वापरले गेल्याचे लक्षात येते. एका मुलीची जन्मतारीख तर १२-१५-१९९० अशी गंमतीशीर नोंदवलेली आहे. बहुतांश वधूंना भाऊ-बहीण कुणीच नाही... एकुलती एक आहे. वेगवेगळ्या पद्धतीने बकरे शोधण्याचा हा फंडा धक्कादायक आहे. 

एक डायरी हाताशी
या वधू-वर केंद्राकडे जाणारा रस्ता अपार्टमेंटच्या मागील बाजूने जातो. तेथे पार्किंगच्या जागेवर एक पत्र्याचा शेड आहे. तेथे एक डायरी होती, त्यात केंद्रात जाणारे नाव नोंदवायचे. ती डायरी या अपार्टमेंटमधील लोकांनी आता आपल्या ताब्यात घेतली आहे. ती डायरी हाताशी आहे. ती थोडी खंगाळून पाहिली तर काही गोष्टी हाताशी लागतील, असा विश्‍वास त्यांना वाटतोय.

संबंधीत बातम्या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com