सांगली पालिकेच्या आमराईत २८ जातींची शेकडो फुलपाखरे

सांगली पालिकेच्या आमराईत २८ जातींची शेकडो फुलपाखरे

सांगली -  नानाविध फुलपाखरं एरवी फारशी दिसत नाहीत. इवल्याशा आयुष्यात त्यांचं बागडणं,  जगणं मनाला उभारी देतं. हा अनुभव घ्यायचाय तर, आमराईतील फुलपाखरू उद्यानाला नक्की भेट द्या ! इथं एक नव्हे, दोन नव्हे तर २८ प्रकारच्या जातींची शेकडो फुलपाखरे बागडतात... विशेष म्हणजे हे उद्यान महापालिकेच्या पुढाकारातून साकारण्यात आले आहे. त्यामुळे शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांसह सांगलीकरांचे हे आकर्षणाचे केंद्र बनते आहे. 

शहरात पर्यटनासाठी एखादी छानशी जागा असायला हवी. यासाठी ‘सकाळ’ने फुलपाखरू उद्यानाची कल्पना मांडली. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी ती कल्पना उचलून धरली. त्यास पदाधिकारी, नगरसेवकांनीही साथ दिली. पालिकेच्या पुढाकारातून असोसिएशन फॉर नेचर कन्झरवेशन अंडरस्टॅंडिंग अँड रिसर्च आणि ॲनिमल सहारा फाऊंडेशनतर्फे हे उद्यान साकारण्यात आले आहे. आमराईतील अर्धा एकर जागेत हे उद्यान असून फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या जातींची फुलं इथे फुलवण्यात आली आहेत. 
गेल्या सात-आठ महिन्यांपासून उद्यानाचे काम सुरू होते. उद्यानाची उभारणी असोसिएशन फॉर नेचर कन्झर्वेशन अंडरस्टॅंडिंग अँड रिसर्चचे निखिल कुलकर्णी, सायली कुलकर्णी, ॲनिमल सहारा फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित काशीद, सर्वदमन कुलकर्णी, 

गोविंद सरदेसाई ही टीम काम करते आहे. उद्यान पूर्णतः नैसर्गिक असून शेकडो फुलझाडे इथे लावण्यात आली आहेत. फुलपाखरांना मकरंद गोळा करण्यासाठी लागणारी नेक्‍टर व होस्ट प्लॅंट इथे लावली आहेत. विशेष म्हणजे फुलपाखरू आणि पक्ष्यांसाठी उपयुक्त अशी दुर्मिळ प्रजातींची झाडेही इथे लावण्यात आली आहेत. काम अंतिम टप्प्यात  असून सद्य:स्थितीत २८ प्रकारच्या जातींची शेकडो फुलपाखरे इथे पहावयास मिळतात. 

काही प्रमुख जातींची फुलपाखरे 
राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉन, सदर्न बर्ड विंग या दुर्मिळ फुलपाखरांसह प्लेन टायगर, ब्लू टायगर, लेमन पॅन्झी, चॉकलेट पॅन्झी, टेल्ड जे, कॉमन जे, टावनी कोस्टर, कॉमन कोस्टर, एन्जल कास्टर, वंडरर, झेब्रा ब्लू, गव्हा ब्लू, रेड पिरीओट, कॉमन पिरीओट, इनिग्रंट, कॉमन मॉरमॉन, रेड फ्रेश अशी विविध जातींची शेकडो फुलपाखरे इथे पाहण्यास मिळतात. 

पालिकेच्या पुढाकारातून होत असलेले हे उद्यान शहरासाठी आकर्षणाचे ठिकाण बनेल. निसर्गचक्र सुरू ठेवण्यात फुलपाखरं केंद्रस्थानी आहेत. त्यांच्यामुळेच अन्नसाखळी कायम राहते. कोणतं फुलपाखरू कोणत्या फुलांकडे, वृक्षांकडे आकर्षित होते, कोणत्या झाडावर, वेलीवर फुलपाखरू अंडी घालते याचा सर्वांगीण अभ्यास करून ही बाग उभारली आहे. शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासाचे केंद्रही बनले’
- रवींद्र खेबुडकर, 

आयुक्त, महानगरपालिका, सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com