चांदोलीच्या विकासाची दिशा ठरवण्यासाठी उद्या बैठक

चांदोलीच्या विकासाची दिशा ठरवण्यासाठी उद्या बैठक

सांगली - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)च्या यादीत जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना ठळक स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली धरण आणि जंगल परिसर आणि जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळांच्या विकासाला गती देताना त्यांचे मार्केटिंग केले जाणार आहे. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. चांदोलीच्या विकासाची दिशा ठरवण्यासाठी मंगळवारी (ता. ३०) बैठक होणार आहे. 

पर्यटन विकासात जिल्ह्याची पर्यटन संपत्ती जगासमोर मांडून ती वाजवून घ्यावी लागते. त्यात सरकारी महामंडळ असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा महाराष्ट्र व गोवा राज्यातील पर्यटन विकासात महत्त्वाचा वाटा आहे. आधी राज्यात, देशात आणि त्यानंतर जगासमोर पर्यटन संपदा घेऊन जाण्याची जिल्ह्याला गरज आहे. त्यादृष्टीने ‘एमटीडीसी’ महत्त्वाची वाट ठरणार आहे. 

या महामंडळाकडे जिल्ह्यातील सागरेश्‍वर अभयारण्याचा अपवाद वगळता इतर ठिकाणांना स्थान मिळालेले नाही. त्यासाठी विशेष प्रयत्नही झालेले नाहीत. आता पर्यटन विकासाला गती देतानाच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली धरण, झोळंबीचे पठार, कृष्णा-वारणा नद्यांचा संगम, औदुंबरचे श्री दत्त मंदिर आणि डोह, नाट्यपंढरी सांगली, मिरजेचे तंतुवाद्य, कृषी पर्यटन अशा मुद्द्यांना प्रकाशात आणले जाणार आहे. या ठिकाणांना ‘एमटीडीसी’ने आपल्या यादीत स्थान द्यावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात यश आल्यास सांगलीतील अनेक स्थळे पर्यटन नकाशावर येणार आहेत. 

निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला चांदोली परिसर ही मुख्य ताकद आहे. तेथे पर्यटन विकासासाठी काही योजना हाती घेण्यात येत आहेत. त्यासाठी मंगळवारी बैठक होत आहे. दुसरीकडे सह्याद्री व्याघ्र राखीवने गतीने योजना आखून पर्यटकांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  

काय आहे ‘एमटीडीसी’
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही सरकारची पर्यटन विकासासाठी स्थापन केलेली संस्था आहे. ती महाराष्ट्र आणि गोव्यातील पर्यटन विकासात महत्त्वाचे योगदान देले. विविध सहलींचे आयोजन, प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, खास ग्रुपसाठी सहलींचे आयोजन आणि देशभरात महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची प्रसिद्धी ही या संस्थेचे मुख्ये कामे मानली जातात. 

सागरेश्‍वरचा समावेश
‘एमटीडीसी’च्या संकेतस्थळावर पलूस तालुक्‍यातील सागरेश्‍वर अभयारण्याचा समावेश आहे. मानवनिर्मित हरणांचे अभयस्थान असा त्याचा उल्लेख आहे. मोर, हरीण, सांबर, काळवीटांचे फोटो त्यावर सजवले आहेत. तेथून कृष्णा नदीचे जे विहंगम दृश्‍य दिसते, ते अन्य कोठून दिसणे शक्‍य नाही, हेही फोटोवरून लक्षात येते. 

या विभागात संधी?
‘एमटीडीसी’च्या जंगल व वन्यजीव विभागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा समावेश होण्याची संधी मिळू शकते. या विभागात सध्या भीमाशंकर, राधानगरी, नागझिरा, चिखलदरा, नवेगाव, ताडोबा, मेळघाट अशा प्रसिद्ध स्थळांचा समावेश आहे. त्यात सागरेश्‍वरला स्थान आहे. आता चांदोलीचा समावेश होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. धरण व धबधबे या विभागातही वारणा नदीवरील चांदोली धरण, या परिसरातील धबधबे समाविष्ट करण्याची संधी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com