मुख्यमंत्र्यांचा सांगलीकरांना "व्हिडीओ' द्वारे संदेश

मुख्यमंत्र्यांचा सांगलीकरांना "व्हिडीओ' द्वारे संदेश

सांगली - सांगली, मिरज आणि कुपवाड शहर विकासाचे परिपूर्ण मॉडेल ठरेल असा कारभार करू. राज्य सरकारने साडेतीन वर्षात महापालिकेला विविध स्वरुपात 242 कोटीचा निधी दिला आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "व्हिडीओ' संदेशाद्वारे केला आहे. राज्य सरकार गतीने काम करीत असून भाजपच्या पाठीशी नागरिकांनी रहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

उद्या प्रचार सांगतेवेळी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचे आयोजन कॉंग्रेस समितीसमोरील पटांगणात केले आहे. तथापि मराठा क्रांती आंदोलकांच्या विरोधाच्या भूमिकेमुळे या सभा होणार का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. भाजपच्यावतीने प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आज मुख्यमंत्र्यांचा सहा मिनिटांचा व्हिडिओ संदेश व्हायरल करण्यात आला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या वीस वर्षाच्या कारभाराचा पंचनामा करतानाच साडेतीन वर्षात राज्य सरकराने दिलेला विकास निधी, त्यातून सुरु असलेली कामे आणि भविष्यात परिपूर्ण शहर विकासाचे मॉडेल तयार करण्याचा शब्द दिला आहे. 

ते म्हणतात, ""मतदान हा प्रत्येकाचा हक्क असला तरी तो विवेकाने वापरायचा असतो. शहरीकरण ही समस्या न समझता संधी मानून विकासाच्या वाटेवर सरकार आहे. त्यामुळे याच विचाराची सत्ता महापालिकेत यावी. 1998 ला महापालिकेची स्थापना होऊन नागरिकांना प्रगत सुविधांचा लाभ नाही. मुलभूत समस्या सत्ताधाऱ्यांना वर्षानुवर्षे सोडवता आल्या नाहीत. अरूंद रस्ते, पार्किंगचा प्रश्‍न, फेरीवाल्यांचा प्रश्‍न, अतिक्रमण, वाहतूक खेळखंडोबा, सातत्याने होणारे अपघात हे प्रश्‍न कायम आहेत. 60 वर्षात केवळ एकच हरिपूर रस्त्यावर भाजीमंडई उभी केली. तेथेही बाजार भरत नाही. विकासाला दिशा व गती देण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले. आता या प्रश्‍नांपासून मुक्ती मिळायला हवी. शेरीनाल्याच्या प्रश्‍नांभोवती गेली वीस वर्षे राजकारण फिरते आहे. मात्र तो प्रश्‍न सत्ताधाऱ्यांना सोडवता आलेला नाही. इतके भयानक दुर्लक्ष क्वचितच इतरत्र झाले असेल. मात्र भाजप सरकारने या शहराच्या विकासात लक्ष घातले आहे. भाजपने साडे तीन वर्षात 242 कोटी रूपये निधी विकासकामासाठी दिला.'' 

ते पुढे म्हणतात, ""केवळ अनुदानात वाढ करून न थांबता सरकारने सर्व कामांना वेग दिला आहे. 2014 पासून रखडलेली अनेक कामे राज्य सरकारच्या पुढाकाराने पूर्ण झाली आहेत. काही पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत. पाणीपुरवठा योजना, वाल्मिकी आवास घरकुल, गुंठेवारी विशेष अनुदान, रस्ते अनुदान, नगरोत्थान अनुदान, स्वच्छ महाराष्ट्र, सीसीटीव्ही, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. ड्रेनेज योजना, हरितक्षेत्र विकासकामे, एकात्मिक गृह निर्माण, दलितवस्ती सुधार आदी कामे लवकरच पूर्ण होतील. मिरजेची अमृत योजना मार्च 2019 पर्यंत पूर्ण होईल. कुपवाडचा 143 कोटीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पडताळणी स्तरावर आहे. हरित क्षेत्र योजनेतून 18 बागा विकसित केल्या. तीन पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.'' 

काळीखण सुशोभिकरण- 
काळीखण सुशोभिकरणासाठी 10 कोटीचा प्रस्ताव आहे. ट्रक टर्मिनन्ससाठी 20 कोटीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अतिशय गतीने विकासाचा प्रयत्न आहे. देशाच्या विकासपर्वात योगदान देण्यासाठी भाजपला मताधिक्‍क्‍याने निवडून द्या असेही आवाहन श्री. फडणवीस यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com