सह्याद्रीच्या 400 लेकी शिवताहेत पिशव्या

सह्याद्रीच्या 400 लेकी शिवताहेत पिशव्या

सांगली - सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये चहूबाजूंनी घनदाट जंगल... सभोवती वाघ, बिबट्या, गव्यांचं वास्तव्य... जंगलात मोजकी घरं, वनसंपत्तीवरच जगणारी माणसं... प्रगत जगाशी त्याचं नातच नव्हतं. पण आता चित्र बदलतेय. ही माणसं नव्या जगाशी जोडून घेताहेत. प्लास्टिकमुक्तीच्या मोहिमेत कापडी, कागदी पिशव्यांनी त्यांना रोजगार दिलाय. 

येथील महिलांनी त्यात पुढाकार घेतला असून मिळून चारशेजणी याकामी राबताहेत. ही संख्या एक - दीड हजारावर जाणार आहे.  

त्यांना या नव्या प्रवाहात आणणारी एक स्त्रीच आहे. डॉ. विनिता व्यास असं त्यांचं नाव. त्या सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या उपसंचालक आहेत. इथल्या महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करताहेत. त्यांना विश्‍वासात घेऊन जंगलात नवचैतन्य फुलवताहेत. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून हे काम होतेय.  

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील ४१ गावांनी योजनेत सहभाग घेतला आहे. आणखी १५ गावांचे प्रस्ताव आहेत. प्रत्येक घरात गॅस सिलिंडर दिल्याने स्वयंपाकासाठी झाडे तोडण्याची गरज उरली नाही. स्वयंपाक झटपट व्हायला लागला. महिलांचा वेळ वाचला. त्यांना स्वयंरोजगाराची संधी मिळाली. 
प्लास्टिकमुक्तीचे आदेश झाल्यामुळे कापडी पिशव्यांना मागणी वाढणार हे लक्षात आले. डॉ. व्यास यांनी नेमके हेच हेरून वाड्या वस्त्यांवर जाऊन कापडी, कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले. 

डॉ. व्यास म्हणाल्या, ‘‘घरात सौरदिवे दिल्याने रात्री उशिरापर्यंत शिवणकाम करणे शक्‍य झाले. प्लास्टिकमुक्तीला हातभार लागलाच; शिवाय जंगलात जगण्याचा आनंदही वाढला. चारशेहून अधिक महिलांना पंचवीस प्रकारच्या पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण दिलेय. तरुणांचाही सहभाग वाढतोय. मागणीप्रमाणे पुरवठा केला जातोय. निगडे, बामणोलीतील पिशव्यांना मागणी आलीय. महाबळेश्‍वर नगरपालिकेने गार्बेज पिशव्या मागवल्या आहेत. हैदराबादची मोठी ऑर्डर मिळणार आहे.’’

सह्याद्रीच्या जंगलात राहणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना सर्वांनी हातभार लावावा. त्यांच्याकडून कापडी, कागदी पिशव्या शिवून घ्याव्यात. त्यासाठी कराड येथील सह्याद्री व्याघ्र राखीवच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
-डॉ. विनिता व्यास,

उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com