राजकीय वक्तव्याला थारा देत नाही - आयुक्त खेबुडकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

सांगली -  ‘‘महापालिकेच्या आयुक्तपदासाठी मी कार्यक्षम आहे की नाही, यावर शासनच निर्णय घेईल; मात्र प्रशासनाबाबत कोणत्याही राजकीय वक्तव्याला प्रशासन प्रमुख म्हणून मी थारा देत नाही’’, असा पलटवार आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

सांगली -  ‘‘महापालिकेच्या आयुक्तपदासाठी मी कार्यक्षम आहे की नाही, यावर शासनच निर्णय घेईल; मात्र प्रशासनाबाबत कोणत्याही राजकीय वक्तव्याला प्रशासन प्रमुख म्हणून मी थारा देत नाही’’, असा पलटवार आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

महापौर हारुण शिकलगार यांनी काही महिन्यांपासून आयुक्तांना लक्ष्य केले आहे. नुकतीच त्यांनी ‘रस्ते करा, नाही तर पालिकेत येऊ देणार नाही, इथपासून ते आयुक्‍त भाजपच्या तालावर नाचतात’, अशा शब्दांत त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. या सर्वांबाबत आज आयुक्तांनी त्यांचे नाव न घेता पत्रकाद्वारेच आपली भूमिका मांडली. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांनाही सावधपणे उत्तरे दिली. 

श्री. खेबुडकर म्हणाले, ‘‘नागरिकांच्या प्रश्‍नांबाबत मी संवेदनशील आहे. वर्षभरात दीडशे कोटींची कामे मार्गी लावली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करीत असताना नागरिकांचे प्रश्‍न व नियमांची सांगड घालून, लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊनच काम केले जात आहे. तसेच आयुक्तपदाचे अवमूल्यन होणार नाही, याचीही खबरदारी घेतली आहे. शिवाय कोणाच्या दबावाने काम करत नाही,’’ असे नमूद करून ते म्हणाले, ‘‘मिरज अमृत पाणीपुरवठा योजना राज्य शासनाने मंजूर केली आहे. यात शासनाच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. त्याबाबतचा अध्यादेशही शासनाने प्रसिद्ध केला आहे. तसेच सांगलीकरांना मुबलक आणि स्वच्छ पाणी देण्यासाठी ७० एमएलडीचा प्रकल्पही लवकरच मार्गी लावला जाईल. त्याला विलंब झाला आहे; मात्र त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे.’’

दर्जाबाबत तडजोड नाही...
‘‘शहरातील प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांना सुरवात झाली आहे. त्यातील दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शिवाय दुरुस्ती दायित्व कालावधीही तीन वर्षांचा करण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे. ठेकेदारांच्या बिलावरून सुरू असलेला गोंधळ मिटवण्यासाठी तातडीने बैठक घेतली जाईल. शहर खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रत्येक रस्त्याचा पक्का आराखडा तयार केला जात आहे. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीत हा अहवाल सादर केला जाईल. त्यातून निधींची उपलब्धता होईल.’’

Web Title: Sangli News Commissioner Ravindra Khebudkar Press