गलितगात्र काँग्रेसला संजीवनी देणार कोण?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

भाजप आक्रमक - काँग्रेसचा ग्रामीण आधार गेला कुणीकडे? 
सांगली - ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांत तयारीची लगबग सुरू झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत विजयाची पताका फडकवल्यानंतर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तळातील आणि महत्त्वाच्या वर्गावर आक्रमण करण्यास सज्ज आहे. मात्र भाजपच्या आव्हानासमोर काँग्रेस गलितगात्र झाल्याचे दिसते आहे.

भाजप आक्रमक - काँग्रेसचा ग्रामीण आधार गेला कुणीकडे? 
सांगली - ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांत तयारीची लगबग सुरू झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत विजयाची पताका फडकवल्यानंतर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तळातील आणि महत्त्वाच्या वर्गावर आक्रमण करण्यास सज्ज आहे. मात्र भाजपच्या आव्हानासमोर काँग्रेस गलितगात्र झाल्याचे दिसते आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात प्रथमच काँग्रेस हतबल झाली आहे. नेमके कोण नेतृत्व करीत आहे त्याचाच सामान्य कार्यकत्तर्त्यांत गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. अशावेळी काँग्रेसला संजीवनी कोण देणार ? असा प्रश्‍न आहे.
दुसरी फळी नाही

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या या जिल्ह्यात आज पक्षाची मूळ ताकद असणारा ग्रामपंचायतीचा घटक पक्षापासून दुरावत चालल्याचे चित्र आहे. ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार पतंगराव कदम हेच जिल्ह्याचे एकमुखी नेते आहेत; पण त्यांच्यानंतरची दुसरी फळी पक्षात सक्षम दिसत नाही. त्यामुळे पतंगराव कदम यांच्यावर किती अवलंबून राहणार? माजी मंत्री मदन पाटील यांचे नेतृत्व जिल्ह्यात होते.

पतंगराव कदम यांच्या बरोबरीने त्यांची ताकद होती; पण त्यांची पोकळी भरुन काढणारे नेतृत्व गेल्या दोन वर्षांत उभे राहिलेले नाही. त्यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील यांना पुढे आणण्याचे प्रयत्न होत असले तरी त्यांना मर्यादा आहेत. त्यामुळे मिरजेसह जिल्ह्याच्या पूर्व भागात काँग्रेसची ताकद क्षीण झाली आहे.

गावातच नेतृत्व झुगारले
जिल्ह्यात दादा आणि कदम गटाचा वाद सर्वश्रुत आहे. विधान परिषदेवेळी विशाल पाटील यांनी शेखर माने यांना मोहनराव कदम यांविरोधात बंडखोरीस भाग पाडून या वादाची ठिणगी उडवली. विधान परिषद निवडणुकीनंतर शेखर माने यांनीच त्यांचे नेतृत्व झुगारल्याचे दिसत आहे.

त्यामुळे महापालिकेतही आता विशाल पाटील गट नावापुरताच आहे. जिल्हा परिषद निवडणुकीवेळीही त्यांनी आपला घरचा उमेदवार पद्माळे (ता. मिरज) चे माजी सरपंच संग्राम पाटील यांना उमेदवारी नाकारली. त्याचा परिणाम म्हणजे गावातच काँग्रेसच्या उमेदवाराला ३००-४०० मतांचा फटका बसला. आता गावातच नेतृत्व झुगारले जात असेल तर जिल्ह्यात कसे करणार?

जिल्ह्यात अस्तित्व किती?
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून कधीकाळी राज्यात लौकिक असलेल्या या जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व किती असा प्रश्‍न आहे. 

आठपैकी केवळ एकच आमदार काँग्रेसचा, तेसुध्दा पतंगराव कदम यांच्यासारखे आहे. शिवाजीराव देशमुख आणि मोहनराव कदम हे दोन विधान परिषदेचे आमदार आहेत. मात्र पक्षाचे अस्तित्व जिल्ह्यात नगण्यच आहे. शिराळ्यात राष्ट्रवादीसोबत आहे. कडेगाव, पलूस हा पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला पण येथे पृथ्वीराज देशमुख यांनी चांगलेच आव्हान उभे केले. जिल्हा परिषद निवडणुकीत केवळ एकच जागा काँग्रेसला मिळाली. जतमध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि मध्यवर्ती बॅंकेचे सदस्य विक्रम सावंत काँग्रेसचा किल्ला लढवत आहेत. तेथे त्यांची ताकद कमी पडते आहे. विलासराव जगताप यांचे आव्हान मोठे आहे.

कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि वाळवा या तालुक्‍यात काँग्रेसचे अस्तित्व शोधण्याची वेळ आली आहे. मिरज तालुक्‍यात भाजपचे सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे या दोन आमदारांनी आता जम बसवला आहे. पंचायत समितीत काँग्रेसची ताकद दिसत असली तरी त्यांचे नेतृत्व कुणाकडे आहे? पुर्वी मदनभाऊं यांकडे असणारे पुर्वभागातील काँग्रेसजन हल्ली खासदार संजय पाटील यांच्याकडे वळल्याचे दिसते आहे.

पक्षाची जिल्ह्यातील ही अवस्था लक्षात घेतली तर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसची स्थिती काय असेल याचे चित्र उभे राहते. काँग्रेसचा मूळ मतदार हाच ग्रामपंचायतीचा घटक होता. तो आता पक्षापासून दुरावला आहे. खरे तर वर्षभरात नोटबंदी, कर्जमाफीचे मृगजळाचे परिणाम शेतकऱ्यांवर झाले आहेत. मात्र त्याचा फायदा उठवण्याची संधी काँग्रेस नेतृत्वाने दवडली हे नाकारता येणार नाही. अशा स्थितीत काँग्रेसला संजीवनी कोण देणार हा प्रश्‍न आहे.
 

दादा घराण्याचे नेतृत्व संपले?
माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि माजी मंत्री मदन पाटील या दादा घराण्यातील दोन शिलेदारांकडे नेतृत्व होते; पण सध्या या घराण्याचे नेतृत्व संपले की काय, असे वाटण्यासारखी स्थिती आहे. मदनभाऊंनंतर प्रतीक पाटील यांनी नेतृत्व करण्यासाठी सरसावायची गरज होती; मात्र ते लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय विजनवासात गेलेत असे वाटत आहे. त्यांचे नेतृत्व ठळकपणे समोर येत नाही. त्यांचे बंधू आणि दादांचे नातू विशाल पाटील यांना नेतृत्व करण्याची इच्छा असल्याचे दिसते; मात्र जनतेत उतरून नेतृत्व करण्यास तयार नाहीत. त्यामुळे नेतृत्वाला मर्यादा पडल्या आहेत.