सांगली पालिका कारभाऱ्यांना भाजपचे लोक खटकतात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

 सांगलीचा भरभरून विकास व्हावा, हे शहर आदर्श व्हावं, असं आम्हाला मनापासून वाटतं.  परंतु भाजपचे लोक महापालिकेत आलेले तिथल्या कारभाऱ्यांना खटकतात. गेल्या चौदा महिन्यांपासून मी पालकमंत्री आहे, महापौरांनी एकदाही मला पालिकेत बोलावले नाही, असा टोला पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना हाणला.

सांगली -  सांगलीचा भरभरून विकास व्हावा, हे शहर आदर्श व्हावं, असं आम्हाला मनापासून वाटतं.  परंतु भाजपचे लोक महापालिकेत आलेले तिथल्या कारभाऱ्यांना खटकतात. गेल्या चौदा महिन्यांपासून मी पालकमंत्री आहे, महापौरांनी एकदाही मला पालिकेत बोलावले नाही, असा टोला पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना हाणला.

एमआयडीसी कार्यालयाच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरून आमदार जयंत पाटील यांनी हा ‘पालकमंत्री की शत्रुमंत्री’ असा उल्लेख केल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी चला जयंतरावांना आमची आठवण तर झाली, अशी  मल्लिनाथी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर त्यांनी जिल्ह्याच्या विविध प्रश्‍नांवर पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील विस्तारित भागाचे पावसाने बेट झाले आहे, लोक पाण्यात राहताहेत, दलदलीत जगताहेत, तुम्ही काहीच का करत नाही? महापालिका निवडणुकीपर्यंत वाईटच होत रहावे, असे भाजपला वाटतेय का? या प्रश्‍नावर ते म्हणाले,‘‘असं वाटायचं काहीच कारण नाही. महापालिकेत आम्हाला कधीच बोलावले गेले नाही. विकासाबाबत चर्चा केली गेली नाही. आमचे लोक कधी गेले तर त्यांना ते खटकते. याचा अर्थ सरळ आहे, त्यांना आम्ही चालत नाही. आम्ही काही करायला गेलो तर ते प्रतिसाद देत नाहीत.’’

‘एमआयडीसी’ कार्यालयाच्या स्थलांतराच्या मुद्द्यावर  मंत्री देशमुख यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘‘हे कार्यालय मी सोलापूरला न्यायला निघालो होतो, हे चुकीचे आहे. सोलापूरमध्ये असे कार्यालय झाले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. अनेक वर्षे तिथल्या उद्योजकांची ती मागणी आहे. कुणाचीही गैरसोय न करता सोलापूरकरांची सोय होणार असेल तर कुणाला काही हरकत असता कामा नये. मी सांगलीचा पालकमंत्री आहे, या जिल्ह्याचे भलेच करणार आहे. स्वतः कवठेमहांकाळला जाऊन उद्योगासाठीची जमीन  मी पाहिली होती. वास्तविक, इथले उद्योजक विकासाच्या प्रश्‍नावर माझ्याकडे कधी आलेच नाहीत. ते पहिल्यांदा भेटले तेही या प्रश्‍नावर.’’ 

महापालिकेतील काँग्रेसच्या सत्तेचे पालकमंत्र्यांना  वावडे आहे. इथल्या प्रश्‍नांसाठी जिल्हाधिकारी  कार्यालयात नियोजन बैठकांसाठी आम्ही गेलो तेव्हा तासन्‌ तास आम्हाला ताटकळत ठेवले  गेले.  महापालिकेचे अधिकार डावलून सत्तेच्या बळावर अमृत योजनेची निविदा जादा दराने परस्पर मंजूर करताना भाजपच्या नेत्यांना आमंत्रणाची गरज वाटली नाही का?
- हारून शिकलगार, महापौर

पालकमंत्री जिल्ह्याचे असतात पक्षाचे नव्हे. त्यांनीच शासनाचा प्रतिनिधी म्हणून आयुक्तांना इथे बसवले आहे. आमंत्रणाची वाट न बघता त्यांनी आयुक्तांना बैठकीचे आदेश द्यावेत. पालक नव्हे तर ‘बालक’ मंत्र्याप्रमाणे ते बोलत आहेत. काँग्रेसमधील अनेक जण दररोजच  त्यांच्या वळचणीला बसतात. ते त्यांना कसे चालते? ब्रॅंडेड महापौरपदाच्या स्वप्नांमुळेच त्यांना असं काही सुचत असावे.
- शेखर माने, उपमहापौर गटाचे नेते

महापालिकेत यायला पालकमंत्र्यांनी लाजायचे अजिबात कारण नाही. ते जिल्ह्याचे प्रमुख आहेत. त्यांनी आयुक्तांना बैठकीसाठी आदेश द्यावेत. शहराच्या प्रश्‍नांबाबत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांचे अपयश झाकण्यासाठी ते कारणे शोधत आहेत.
-
गौतम पवार
 स्वाभिमानी आघाडीचे नेते

सांगलीतील एमआयडीसी कार्यालय सोलापूरला पळवून न्यायचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्र्यांचा सांगलीबद्दलचा कळवळा सर्वांना पुरता समजला आहे. महापालिकेच्या विविध प्रश्‍नांबाबत त्यांनी आजतागायत ढुंकनही पाहिलेले नाही. निवडणुकांमुळेच त्यांना महापालिका क्षेत्राची आठवण होत आहे.
- पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष

पालकमंत्र्यांना महापौर-उपमहापौरांनी जरूर आवतन द्यावे. शहर विकासाच्या आणि प्रश्‍नांच्या सोवडणुकीसाठी पालकमंत्र्यांनी आमंत्रणाची कशाला वाट पहावी. बर मग आता आम्हीच निमंत्रण देऊ.
- संजय बजाज, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष

Web Title: sangli news corporation leaders ignore to BJP peoples