देशभरातील डेस्टिनेशन्स मिरजेतून एका टप्प्यात

देशभरातील डेस्टिनेशन्स मिरजेतून एका टप्प्यात

मिरज - उन्हाळ्याच्या सुटीत सहलीचे प्लॅनिंग करताय? तर मग मिरजेतून देशभरात थेट धावणाऱ्या अनेक एक्‍स्प्रेस रेल्वे गाड्या तुमच्यासाठी सज्ज आहेत. गेल्या काही वर्षांत मिरजमार्गे नवनव्या रेल्वेगाड्या सुरू झाल्याने देशाचा बहुतांश प्रवास एका टप्प्यात करणे  शक्‍य झाले आहे. दक्षिणेत पाँडेचेरीपासून उत्तरेत दिल्लीपर्यंत आणि बिहारमधील धनबादपासून गोव्यापर्यंतच्या सर्व मार्गांवरील गाड्या मिरजेतून थेट उपलब्ध झाल्या आहेत. बहुतांश महाराष्ट्रदेखील एक दिवसाच्या प्रवासाच्या टप्प्यात आला आहे.  

तुलनेने अतिशय स्वस्त आणि सुरक्षित प्रवासामुळे सुट्यांच्या हंगामात रेल्वेगाड्या हाउसफुल्ल धावत  आहेत. सध्याही गोव्याकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये  आरक्षणे फुल्ल झाली आहेत. दक्षिणेतून उत्तरेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सोलापूर किंवा मिरजमार्गेच धावतात. गोवा-निजामुद्दीन, यशवंतपूर-निजामुद्दीन (संपर्कक्रांती) या गाड्या तुम्हाला थेट देशाच्या राजधानीत नेऊन सोडतात.

 तेथून उत्तरेकडील अनेक पर्यटन व धार्मिक स्थळे एक दिवसाच्या प्रवासाच्या आहेत. पुण्यातून झेलम एक्‍स्प्रेस दररोज संध्याकाळी साडेपाच वाजता सुटते. सकाळी कोयना एक्‍स्प्रेसने मिरजेतून निघाले की संध्याकाळची झेलम गाठता येते; तेथून जम्मू-काश्‍मीरचा प्रवास आवाक्‍यात येतो. वैष्णोदेवी, वाघा बॉर्डरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरते. 

कोल्हापूर-धनबाद साप्ताहिक दीक्षाभूमी एक्‍स्प्रेस थेट पारसनाथ, बुद्धगया या धार्मिक स्थळांना घेऊन जाते. प्रत्येक शुक्रवारी दुपारी पाऊण वाजता ही गाडी मिरजेत येते. नव्यानेच वाढवण्यात आलेल्या यशवंतपूर-चंदीगड एक्‍स्प्रेसमुळे दिल्लीच्याही पुढे मजल मारणे शक्‍य झाले आहे.

यशवंतपूर-जोधपूर, म्हैसूर-अजमेर या गाड्या थेट राजस्थानात घेऊन जातात. मिरजेतून सुमारे छत्तीस  तासांत अजमेरच्या गरीबनवाज दर्ग्याला जाता येते. तेथून पुष्करचे ब्रह्मदेव मंदिर, आमेर किल्ला, गुलाबी जयपूर शहर, निळे जोधपूर शहर हा राजस्थानचा ऐतिहासिक  ठेवा आवाक्‍यात आहे. अपवाद फक्त थेट जयपूरचा. जयपूरसाठी मिरजेतून थेट गाडी नाही. पुण्यात जाऊन जयपूरसाठी एक्‍स्प्रेस पकडावी लागते.

दादरमधून सोमवार, बुधवार व गुरुवारी मिरजमार्गे धावणारी पाँडीचेरी एक्‍स्प्रेस थेट दक्षिणेत घेऊन जाते. दक्षिणेत जाण्यासाठी दादर-तिरुनेलवेल्ली, पुणे-एर्नाकुलम या गाड्याही आहेत. तिरुपतीला जाणारी हरिप्रिया एक्‍स्प्रेस तर बारमाही भरून धावत असते. गोवा-निजामुद्दीन एक्‍स्प्रेसमधून अग्य्राचा ताजमहाल दीड दिवसांच्या प्रवासात गाठता येतो. 

कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-सोलापूर, मिरज-परळी या गाड्यांनी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाडा जोडला आहे. तर कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-गोंदीया (महाराष्ट्र) एक्‍स्प्रेसने विदर्भाला जवळ केले आहे. शेगावच्या गजानन महाराजांच्या चरणी या गाड्या नेऊन सोडतात. तुलनेने अतिशय स्वस्त दरात संपूर्ण भारत पालथा घालणे रेल्वेने शक्‍य केले आहे. 

अशी आहे मे महिन्यातील आरक्षण स्थिती
दक्षिणेत जाणाऱ्या दादर-पुद्दुचेरी एक्‍स्प्रेसचे आरक्षण संपूर्ण मे महिन्यासाठी फुल्ल झाले आहे. दादर-तिरुनेलवेल्ली एक्‍स्प्रेसची प्रतीक्षायादी आजच्या तारखेला पन्नासहून अधिकवर गेली आहे. दादर-म्हैसूर शरावती एक्‍स्प्रेसमध्ये मे आणि जून महिन्यात स्लिपर श्रेणीची जागा शिल्लक नाही. पुणे-अर्नाकुलमही मे महिन्यात हाऊसफुल्ल आहे. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्‍स्प्रेसमध्ये मात्र मे महिन्याची स्लिपर श्रेणीची काही तिकिटे अद्याप शिल्लक आहेत. जोधपूर-यशवंतपूर, गांधीधाम-बंगळूर, निजामुद्दीन-म्हैसूर, चंदीगड-यशवंतपूर या गाड्यांमध्येही पाय ठेवायला जागा नाही. कोल्हापुरातून सुटणाऱ्या आणि बंगळूरला  जाणाऱ्या राणी चन्नम्मा एक्‍स्प्रेसमध्ये मात्र मे महिन्यासाठी अद्याप बऱ्याच जागा शिल्लक आहेत. बुद्धगयाला जाणाऱ्या भाविक पर्यटकांसाठी कोल्हापूर-धनबाद ही शुक्रवारची साप्ताहिक दीक्षाभूमी एक्‍स्प्रेस अद्याप काही जागांसह उपलब्ध आहे. मे आणि जून महिन्याची तिकिटे शिल्लक आहेत. बंगळूर-गांधीधाम एक्‍स्प्रेस मे, जून आणि जुलै या तीनही महिन्यात हाऊसफुल्ल आहे. कोल्हापूर-अहमदाबाद ही शनिवारची साप्ताहिक एक्‍स्प्रेसदेखील मे-जून महिन्यात फुल्ल झाली आहे. दररोज दिल्लीसाठी धावणारी गोवा-निजामुद्दीन एक्‍स्प्रेसदेखील मे महिन्यात रिकामी नाही. जिवाचा गोवा करणाऱ्यांसाठी गोवा एक्‍स्प्रेसमध्ये मात्र कशीबशी जागा उपलब्ध होऊ शकते. तिचे आरक्षण काठावर येऊन ठेपले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com