चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

सांगली - राज्य शासनाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यात राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचारी शेतकऱ्यांना समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे. ती माहिती मिळाल्यानंतर याबाबत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक निर्णय शक्‍य आहे, असे सुतोवाच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

ते म्हणाले, 'ज्या शेतकऱ्याला कर्जमाफीची खरेच गरज आहे, तो वंचित राहू नये, यासाठी शासनाने परिपूर्ण विचार करूनच कर्जमाफीचे निकष बनवले. चतुर्थश्रेणी कर्मचारी असणाऱ्या शेतकऱ्यांचा यात समावेश करण्याची मागणी होत आहे. मात्र, त्यांना सरकारी नोकरी आहे, निश्‍चित उत्पन्नाचा स्रोत आहे, सर्व सुट्या-भत्ते आहेत. तसेच ज्यांची उपजीविका केवळ शेतीवरच अवलंबून आहे, ते शेतकरी सध्या अडचणीत आहेत. त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांना कर्जमाफी दिली आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांची माहिती शासनाकडून मागवली आहे.''