गुंडांपुढे पोलिसांनी हात टेकले काय?

गुंडांपुढे पोलिसांनी हात टेकले काय?

सांगली -  जिल्ह्यात गुन्हेगारांनी उच्छाद मांडल्याचे चित्र गेले काही दिवस दिसू लागले आहे. गुंडांच्या टोळ्या संपल्यात असे वाटत असताना त्या पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचे हे ठसठशीत अपयश मानावे लागेल. त्यांच्या गाफीलपणामुळे गुडांच्या हालचाली त्यांना समजल्या नाहीत. त्यामुळे दिवसाढवळ्या खुनाचे प्रकार घडत आहेत. चेन स्नॅचिंग, वाटमारी, दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडल्याने पाठ थोपटून घेणाऱ्या पोलिसांना या टोळ्यांचे आव्हान पेलणे शक्‍य आहे का? असा प्रश्‍न आहे.

एकेकाळी जिल्ह्यात दहशत माजवलेल्या सावंत  टोळीचाच गुंड असणाऱ्या बाळू भोकरे याच्या  साथीदाराचा खून दिवसाढवळ्या झाल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. गेल्या महापालिका निवडणुकीपर्यंत बाळू भोकरे सावंत टोळीत होता. त्यावेळी त्याने दाद्या सावंत नंतर सचिन सावंत आणि आता बाळू ऊर्फ महेंद्र सावंत यांच्याप्रमाणे नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहिले. मात्र नागरिकांनीच ते उद्‌ध्वस्त केले.
भोकरे सावंत टोळीतून फुटला 

महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर सावंत टोळीतून काही महिन्यांपूर्वी त्याने बाहेर पडून स्वत:ची टोळी करून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न चालवला आहे. खासगी सावकारी, वर्चस्ववादातून सावंत प्लॉट, शंभर फुटी परिसरात आपली दहशत पसरवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याचा दबदबा वाढूही लागला होता. त्यामुळे तो आपल्याला वरचढ होईल की काय? अशी भीती सावंत टोळीला होती. त्यातूनच बाळू भोकरेचा गेम करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र तो काल पळून गेल्याने फसला आणि शकील मकानदारचा गेम झाला. वास्तविक शकीलचे पोलिस दफ्तरी कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हते. पण गुंडांच्या टोळीत गेल्याने तो हकनाक जीवाला मुकला.

टोळीयुद्धाचा धोका 
बाळू भोकरे सावंत टोळीतून फुटल्यानंतर आता पुन्हा टोळी युद्धाचा धोका वाढला आहे. सावंत टोळीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी बाळू भोकरेची टोळी वापरली जाणार हे उघड आहे. कालच्या घटनेत शकील मकानदार ठार झाला. पण बाळू भोकरे बचावला. यातूनच टोळीयुद्ध भडकण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या घटनेनंतर पोलिस या टोळ्यांना कसे मोडून काढणार हा शहरापुढचा चिंतेचा विषय आहे.

इम्रान मुल्लाच्या आरोपीचाही खून
जुलै महिन्यात इम्रान मुल्लाच्या खुनातील प्रमुख संशयित आरोपी फिरोजखान पठाण याचा खून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला होता. इम्रान मुल्लाच्या टोळीनेच त्याचा खून केला. इम्रानच्या खुनात आरोपी फिरोजखानच्या हालचालीवर त्यांची नजर होती. मात्र पोलिसांची या टोळ्यांवर नजर नव्हती. 

कवठेपिरानमधील युवकाचा खून मित्रांकडूनच
कवठेपिरानमधील युवक प्रवीण पवार याचा त्याच्या मित्रांनीच खून केल्याचे नऊ महिन्यांनी उघडकीस आले. यातील आरोपी व्यसनाधीन झालेले आहेत. त्यांच्यावरही गुन्हे नोंद आहेत. पवार बेपत्ता झाल्यानंतर नऊ महिने त्याच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला नाही हे  पोलिसांचे अपयशच आहे. हीसुद्धा एक टोळी पोलिसांसमोर आव्हान आहे.

कसबेडिग्रजच्या महिलेचा खून सुपारी देऊन
कसबेडिग्रजच्या महिलेचा जुलै महिन्यात खून झाला होता. तिच्या पतीनेच सुपारी देऊन हा खून केला. सुपारी घेणारे युवक गावातीलच होते. म्हणजे  आता नवीन पिढीत सुपारी घेऊन खून करणारीही टोळी तयार होत आहे. त्यांच्या हालचालीवरही लक्ष ठेवण्याची गरज आहे. कसबेडिग्रज आणि कवठेपिरान ही शेजारची गावे असल्याने या दोन टोळ्या भविष्यात संघर्षात उतरणार नाहीत याची खात्री देता येत नाही.

‘डीबी’ विभाग निष्क्रिय...
वास्तविक शहर आणि ग्रामीण भागातील टोळ्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्याची जबाबदारी गुप्तवार्ता विभागाच्या पोलिसांची आहे; पण गेल्या दोन महिन्यांत झालेले खून पाहता पोलिसांपर्यंत त्यांची कोणतीच माहिती नसावी असे दिसते. शिवाय लपूनछपून खून करण्याचीही गरज नाही असे दिवसाढवळ्या खून झाले आहेत. त्यामुळे पोलिसी खाक्‍या किंवा खाकी वर्दीचा वचक संपला आहे की काय, असे वाटण्यासारखी स्थिती आहे. आता नव्या टोळ्यांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com