‘पीएनबी घोटाळा’ ३० हजार कोटींवर? - देवीदास तुळजापूरकर

‘पीएनबी घोटाळा’ ३० हजार कोटींवर? - देवीदास तुळजापूरकर

सांगली - पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये साडेअकरा हजार कोटींचा घोटाळा प्रथमदर्शनी उघडकीस आला  आहे. हा घोटाळा ३० हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्‍यता असल्याचे ऑल इंडिया बॅंकिंग असोसिएशनचे सहसचिव कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर यांनी  येथे व्यक्त केले. या घोटाळ्यास रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया जबाबदार आहे. आरबीआयच्या धोरणांमुळेच देशातील बॅंका अडचणीत आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

सांगलीतील उद्योग भवनमध्ये बॅंक ऑफ इंडिया कर्मचारी संघटनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त ‘बॅंकिंग क्षेत्रातील भविष्यातील अडथळे आणि संघटनेपुढील आव्हाने’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी बॅंक ऑफ इंडिया स्टाफ युनियन पुणेचे अध्यक्ष उल्हास देसाई होते.  सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेचे महत्त्व, तिची कामे, कर्मचाऱ्यांची कर्तव्याबाबत त्यांनी सविस्तार मार्गदर्शन केले. 

कॉम्रेड तुळजापूरकर म्हणाले, ‘‘पंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने कर्मचाऱ्यांमुळे हा प्रकार घडला असल्याबाबतचे स्पष्टीकरण दिले. परंतु हा प्रकार नेमका कसा घडला समजून घेतला पाहिजे. यंत्रणेला जबाबदार धरायचे की कर्मचाऱ्यांना असाही प्रश्न आहे. कर्मचाऱ्यांमुळे प्रकार घडल्याचे कारण पुढे करून कर्मचाऱ्यांवरील कारवाया सुरू झाल्या. प्रसार माध्यमांना दाखवण्यासाठी बळीचा बकरा म्हणून कर्मचाऱ्यांवर कारवाईचा प्रताप आहे. या घोटाळ्याची सर्वांत मोठी जबाबदारी रिझर्व्ह बॅंकेचीच आहे. पंजाब नॅशनल बॅंकेमधील घोटाळ्या कर्मचारी जबाबदार असतील, तर त्यांना पाठीशी घालणार नाही, 

पंजाब नॅशनल प्रकरणाची चौकशी सुरूच असल्याने ३० हजार कोटींपर्यंत घोटाळा जाण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. भारतीय बॅंकातील मोठी कसर म्हणजे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आहे. त्यांच्या भूमिकेमुळे देशातील बॅंकिंग क्षेत्राची वाट लागल्याचे दिसते. बॅंका अडचणीत येण्यास आरबीआयचे धोरण जबाबदार असल्याने त्यांच्याविरोधात ऑल इंडिया बॅंक युनियन लढा उभारणार आहे. कदाचित त्यासाठी पुन्हा संपाचे हत्यार उपसावे लागेल. परंतु लढल्याशिवाय पर्याय असणार नाही.’’

मिटकॉनमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक

ते म्हणाले,‘‘मिटकॉनमध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मिटकॉन आणि खासगी बॅंकांमध्ये पैसे ठेवणे अधिक धोकादायक असल्याचे चित्र दिसून येते. मोठमोठ्या खासगी कंपन्यांतील पैसा बुडत असल्याची माहिती सातत्याने समोर येत आहे. खासगी क्षेत्रामध्ये गुंतवला जाणारा पैसा सार्वजनिक बॅंकांमध्ये ठेवण्यात आला पाहिजे, याबाबत सामान्य लोकांना बॅंकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पटवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. सार्वजनिक बॅंकांतील पैसा सुरक्षित राहणार असल्याबाबत प्रबोधन करण्याची गरज आहे.’’

गिरीश कुबेर आणि शेखर गुप्ता ही मंडळी सार्वजनिक बॅंकांचे खासगीकरण्याच्या सूचना सरकारकडे सातत्याने करीत आहेत. सार्वजनिक बॅंकांचे अस्तित्व टिकवायचे असेल या बॅंका सामान्य लोकांच्या आहेत, हे पटवून देण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. बॅंकेत चांगली कार्यपद्धती निर्माण करा, ग्राहकांना दुखावून बॅंक चालू शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. बॅंक ऑफ इंडिया कर्मचारी संघटनेचे दीपक पाटील, सांगली विभागाचे उपाध्यक्ष संजय देशपांडे, कोल्हापूर विभागाचे उपाध्यक्ष सुहास शिंदे, सहाय्यक सचिव विकास देसाई, सातारा विभागाचे सहाय्यक सचिव मारुतराव निकम, अनिल इनामदार, संजय देशपांडे आदी उपस्थित होते.

सार्वजनिक बॅंकांतील मार्केट शेअर ७० टक्‍क्‍यांवर 
१९९१ मध्ये सार्वजनिक बॅंकांचे मार्केट शेअर ९० टक्के होते. सद्य:स्थितीत मार्केट शेअर ७० टक्‍क्‍यांवर आले आहे. खासगी बॅंकांनी ग्राहकांना चांगली सेवा देऊन सार्वजनिक बॅंकांतील ग्राहक खेचले. सार्वजनिक बॅंकांनी व्यवसाय टिकविण्यासाठी उत्तम सेवा देण्याची गरज आहे. बॅंक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हा बदल न केल्यास भविष्यात सार्वजनिक बॅंकांचा काळ अडचणीचा असेल, असा इशारा ऑल इंडिया बॅंकिंग असोसिएशनचे सहसचिव तुळजापूरकर यांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com