‘डीपीसी’ बिनविरोधवर शिक्कामोर्तब

‘डीपीसी’ बिनविरोधवर शिक्कामोर्तब

एका जागेची अदलाबदल शक्‍य; मुंबईत उद्या अंतिम बैठक 
सांगली - जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात एका जागेची अदलाबदल शक्‍य आहे. नियोजनच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. 

नियोजन समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बॅंकेत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, झेडपी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, बाळासाहेब पाटील, पक्षप्रतोद चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, जितेंद्र पाटील यांची संयुक्त बैठक झाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्याबरोबर सोमवारी सविस्तर चर्चा झाली आहे. जिल्हा नियोजनचा वार्षिक आराखडा ३२०० कोटी रुपयांचा आहे. आपापल्या भागाच्या विकासासाठी जादा निधी मिळावा, यासाठी सदस्यांनी या समितीत वर्णी लागावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. सत्ताधारी भाजपसोबत विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पहिली बैठक सकारात्मक झाली. नियोजन समिती बिनविरोध निवडणुकीची यंदाही परंपरा कायम ठेवण्यासाठी नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी झेडपी गटातील एक जागा अतिरिक्त मागितली आहे. त्या बदल्यात भाजपकडून नगरपालिका अथवा नगरपंचायतमध्ये एक जागा मागितली आहे. जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय मुंबईत गुरुवारी (ता. १०) नेत्यांच्या उपस्थितीत होईल.

सदस्यांच्या संख्येनुसार नियोजन समितीत जागा मिळाव्यात, अशी सर्वच पक्षांची धारणा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून एक जागा वाढवून मागितली आहे. त्यामुळे आघाडीला १० जागा मिळू शकतील. सत्ताधारी भाजपकडून त्या बदल्यांत नगरपंचायत किंवा नगरपालिकेतील एक जागा देण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवला आहे. झेडपीत भाजपची सत्ता आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात आहे. झेडपीतील सभापतीसह विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या गेल्या दोन निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. तीच परंपरा कायम ठेवण्याबाबत नेत्यांत चर्चा झाली. आता जागावाटपासाठी मुंबईत गुरुवारी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होईल.

जिल्हा परिषदेतून २३ सदस्य ‘डीपीसी’वर 
जिल्हा परिषदेच्या ६० सदस्यांमधून २३ सदस्य जिल्हा नियोजन समितीवर निवडून जातील. सत्ताधारी भाजप आघाडीचे संख्याबळ ३५ आहे.

आघाडीतील १४ सदस्य, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष असे विरोधी आघाडीचे संख्याबळ २५ आहे. या संख्याबळानुसार जिल्हा नियोजन समितीवर विरोधी आघाडीचे ९ सदस्य निवडून जातील. काँग्रेसचे संख्याबळ १० सदस्यांचे आहे. त्यांचे ४ सदस्य निवडून जातील. राष्ट्रवादी व एक अपक्ष यांचे संख्याबळ १५ सदस्यांतून ५ सदस्य जिल्हा नियोजनवर निवडून जातील.

पालिकेतून ३, पंचायतून १ डीपीसीवर 
इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा, पलूस, जत सहा पालिकांमधील तिघे ‘डीपीसी’वर निवडले जातील. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे तीनही जागा या आघाडीकडे जातील. कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर, शिराळा या चार नगरपंचायतींमधून एक नगरसेवक ‘डीपीसी’वर निवडला जाईल. राष्ट्रवादीने आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्याशी चर्चा झाली आहे. आमदार पतंगराव कदम यांच्याशीही बोलणी सुरू आहेत. 

जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चेच्या पहिल्या बैठकीत एकमत झाले. कोणी किती व कोणत्या जागा घ्यावयाच्या हे निश्‍चितीसाठी गुरुवारी बैठक आहे. जागावाटपानंतर नियोजन समितीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. ११) सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे एकत्रित अर्ज भरले जातील.’’
- विलासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com