कर्जमाफी नको, कर्जमुक्त करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

सांगलीत शेतकरी संघटनेची मोर्चाद्वारे सरकारकडे मागणी
सांगली - शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती द्या, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना देण्यात आले. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चा सुरू झाला. नूतन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळाने श्री. काळम-पाटील  यांना निवेदन दिले. 

निवेदनात म्हटले आहे, की मुख्यमंत्र्यांनी  कर्जमुक्तीऐवजी जुजबी कर्जमाफी केली आहे. सरकारच्या निर्णयावर शेतकरी पूर्णपणे समाधानी नाही. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे कर्जमाफी नको तर कर्जमुक्तीची आवश्‍यकता आहे. शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याची परिस्थिती निर्माण केली पाहिजे. संपूर्ण कर्ज व थकीत वीज बिलातूनही मुक्ती मिळावी. संघटनेने तयार केलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सहा एप्रिल रोजी सादर केला. त्याची अंमलबजावणी केली जावी. आगामी दहा वर्षांत कोणतीही कर्जवसुली केली जाऊ नये. जीवनावश्‍यक वस्तू कायदा हटवला जावा किंवा शेतमालाला जीवनावश्‍यक वस्तू कायद्यातून वगळावे. कमाल जमीन धारणा कायदा रद्द करावा. जैव सुधारित तंत्रज्ञानाचा पुरस्कार करून शेतीसाठी संशोधनास प्राधान्य द्यावे. शेतीपंप व घरगुती वीजदरातील दरवाढ रद्द करावी आदी मागण्या केल्या आहेत.

शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख रामचंद्र कणसे, सुनील फराटे, संजय कोले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. मोहन परमणे, अल्लाउद्दीन जमादार, धनपाल गळतगे,  गुंडा माळी, संजय पाटील, नवनाथ पोळ, एकनाथ कापसे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बंदोबस्त तैनात होता.