बालमधुमेहींसाठी आहार, व्यायाम महत्वाचा - डॉ. पटवर्धन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

मिरज - कोणत्याही औषधाने मधुमेह पुर्ण बरा होत नाही, योग्य आहार आणि व्यायामाने फक्त नियंत्रण ठेवता येते; त्यामुळे फसव्या प्रचाराला बळी पडू नका असे आवाहन डॉ मिलींद पटवर्धन यांनी केले.

मिरज - कोणत्याही औषधाने मधुमेह पुर्ण बरा होत नाही, योग्य आहार आणि व्यायामाने फक्त नियंत्रण ठेवता येते; त्यामुळे फसव्या प्रचाराला बळी पडू नका असे आवाहन डॉ मिलींद पटवर्धन यांनी केले.

टाईप वनच्या बालमधुमेहींच्या पालकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. मधुमेह जागृती मंचाने कार्यशाळा आयोजित केली होती. दैनिक "सकाळ"चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी उद्‌घाटन केले. यावेळी मंचच्या अध्यक्षा डॉ. वर्षा पटवर्धन, कार्यवाह सुधीर नाईक, खजिनदार वसंत खाडीलकर आदी उपस्थित होते.

डॉ पटवर्धन म्हणाले, जाहीरातबाजीला भुलून मुलांच्या आयुष्याचं नुकसान करु नका. काही महिन्यांपुर्वी एकजण कान टोचून ऍक्‍युपंक्‍चर द्वारा उपचार करणारा शहरात आला होता. लोकांना हजारो रुपयांना फसवून निघून गेला. मधुमेहावर कोणतेही निर्णायक औषध नाही. आहार - व्यायामाद्वारे तो फक्त नियंत्रित करता येतो. मधुमेहाने हिरड्याही खराब होतात; त्यामुळे मुलांना नियमित दात घासण्यास सांगा. फळे सालीसह खा, चपात्या कोंड्यासह खा. बाजारातील भाज्या घरात आणल्यानंतर किमान अर्धा तास पोटॅशियम परमॅंगनेट किंवा व्हिनेगरच्या पाण्यात बुडवून ठेवा. मुलांना शाळेत जाताना प्लास्टीकच्या बाटलीत पाणी व डब्यात जेवण देऊ नका. प्लास्टीक सातत्याने विघटीत होत असते. त्याच्याऐवजी स्टीलची भांडी द्यावीत. दही, अंडे सर्वोत्तम अन्न आहे. व्यायामाबरोबरच मुलाचे स्वतःचे छंदही महत्वाचे आहेत. वाचन, करमणुक, वाद्य वाजवणे याव्दारे त्याला स्वतःचे आयुष्य जगू दे. तुम्ही आयुष्यात जे काही केलंत ते त्यालाही करु दे.

डॉ. पटवर्धन म्हणाले, प्रत्येक मधुमेही बालकाच्या गळ्यात किंवा मनगटावर त्याचे ओळखपत्र असू दे. अपघातप्रसंगी ते उपयुक्त ठरते. मधुमेह वेळीच उपचार केले नाहीत तर गुंतागुंत निर्माण होते, ती टाळण्याचा प्रयत्न करा. यावेळी मधुसखा विशेषांकाचे प्रकाशन झाले. डेल कार्नेजी फौंडेशनच्यावतीने निहारीका दत्ता यांनी मुलांसाठी गुणसंवर्धन कार्यशाळा घेतली. त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यात आले. शेखर्‌ जोशी यांनी बदलत्या जीवनशैलीत आरोग्याचे महत्व विशद केले.

Web Title: Sangli News Dr Milind Patvardhan comment