दुष्काळाविरोधातील लढ्याचा हिवतड प्रयोग

दुष्काळाविरोधातील लढ्याचा हिवतड प्रयोग

पाणी...माणसाचं जीवन उभे करू शकते. मात्र, ते वेळेत मिळाले तर. कोरडवाहू शेतकऱ्यांचे मूळ दुखणे पाणीच आहे. माणसांना, जनावरांना, उद्योगधंद्यांना शासन पाणी पुरवते. त्याप्रमाणे फळशेतीला ते देण्याचे सूत्रबद्ध नियोजन केले तर या राज्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता येतील, असे गृहीतक मांडून बलवडी (भाळवणी)चे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांनी जानेवारी २०१५ पासून आटपाडी तालुक्‍यातील हिवतड येथे कोरडवाहू शेती पिकाऊ करण्यासाठीचा चाकोरीबाहेर प्रयोग सुरू केला. त्याचे निष्कर्ष महात्मा गांधींच्या त्या वाक्‍याची तंतोतंत प्रचिती देणारे आहेत. बापू म्हणाले होते, ‘‘या भूतलावरच्या प्रत्येक माणसाची भूक भागवण्याचे सामर्थ्य या निसर्गाला शक्‍य आहे. मात्र, एका माणसाची हाव भागवणे अशक्‍य आहे.’’ काय आहे हा प्रयोग आणि त्याचे निष्कर्ष....

दूर आखाती देशातून खोल जमिनीच्या पोटातून कच्चे तेल काढून जगाच्या कानाकोपऱ्यांत पोचवले जाण्याची व्यवस्था उभी राहू शकते; तर त्याच पद्धतीने दुष्काळी भागात जेवढा पाऊस पडतो, तेवढ्या पाण्याचे तिथेच काटेकोर नियोजन का शक्‍य नाही? असा प्रश्‍न घेऊन संपतराव पवार यांनी हिवतड प्रयोगाची सुरवात केली. डाळिंब शेती आटपाडी तालुक्‍यासाठी वरदानच. एका डाळिंब झाडासाठी वर्षाला चारशे लिटर पाणी पुरते. मग एवढ्या पाण्याची सोय करून द्यायची. एकरात २०० झाडे. तेवढ्या झाडांसाठी प्रतिवर्षी ८० हजार लिटर पाणी हवे. त्यासाठी साठवणूक क्षमता निर्माण करून त्या शेतकऱ्यांना वर्षभर पाण्याची शंभर टक्के खात्री दिली. त्यासाठीची सिंथेटिक पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात आली. दर आठ दिवसाला ही टाकी टॅंकरद्वारे भरून दिली. झाडे, खड्डे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सेंद्रिय खताची माहिती, अशी सर्व काही व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली. 

प्रयोगासाठी रामोशी समाजातील १० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. त्यापैकी नऊ कुटुंबे ऊसतोड व मजुरीवर उपजीविका करणारे आहेत. या सर्व शेतकऱ्यांसाठी सांगलीतील आर्किटेक्‍ट प्रमोद चौगुले, श्रीकांत पाटील, पापा पाटील, पुण्यातील राजेंद्र मदने,  ॲड. विनोद गोसावी, जयंत बर्वे, विलास चौथाई यांनी मदतीचा हात देऊ केला. सामाजिक भान असणारे अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते खड्डे खोदाईचा प्रारंभ झाला. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू एन. जे. पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा हात पुढे केला. शेकडो विद्यार्थ्यांनी श्रमदान केले आणि अवघ्या शंभर दिवसांत फोंड्या माळावर दोन हजार डाळिंब रोपांची लागवड झाली. नियोजनाप्रमाणे हा प्रकल्प कार्यान्वित झाला. खड्डे खोदाईसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिह कुशवाह यांनी रोजगार हमीतून मदत द्यायची तयारी दर्शवली. मात्र, त्यासाठी खोटे रेकॉर्ड तयार करायला हवे. संपतरावांनी त्याला नकार दिला. शेवटी लोकांच्या पाठबळावरच हा प्रयोग पुढे न्यायचा निर्धार केला आणि तडीसही नेला. 

निष्कर्ष
दहा शेतकऱ्यांच्या गटाचे नाव ‘जय मल्हार ग्रुप’ असे ठेवण्यात आले. त्यातील प्रत्येक शेतकऱ्याला टाकी, पाईप्स, खते, औषधे, रोपे आणि व्यवस्थापन खर्च असा ४० हजार इतका आला. दुसऱ्या वर्षी ११ हजार रुपये खर्च आला. दहा शेतकऱ्यांसाठी पहिल्या वर्षी चार लाख रुपये इतका खर्च आला. त्यापैकी दोन शेतकऱ्यांचे प्रयोग अयशस्वी झाले. त्यापैकी बाळासाहेब जावीर, भाऊसाहेब मंडले, महादेव जावीर, मालसिंग मंडले, नानासाहेब जावीर, पोपत मंडले, रावसाहेब मंडले, विलास खांडेकर अशा आठ शेतकऱ्यांना तिसऱ्या वर्षापासून उत्पन्न सुरू झाले. ४० ते ८० रुपये प्रती किलो डाळिंबाला भाव मिळाला. प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी ७० हजार ते एक लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळाले. आता या शेतकऱ्यांना वर्षभरासाठी पाण्याची खात्रीची बेगमी करायची तर प्रत्येकी २० हजार रुपयांचा खर्च आहे. त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी हा खर्च करणे अपेक्षित आहे. शिवाय या शेतीत दोन रोपांमध्ये त्यांचा घरचा भाजीपाल्याचा खर्च परस्पर निघाला. एक एकर शेतीत एखादे कुटुंब आपला जगण्यासाठीचा खर्च बाहेर काढू शकेल का हा या प्रयोगाचा हेतू होता. तो आणखी शास्त्रशुद्धपणे समाजासमोर मांडण्यात येत आहे. संपतरावांचे चिरंजीव ॲड. संदेश यांनी आता त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले,‘‘या प्रयोगाचा पुढचा टप्पा येत्या ऑक्‍टोबरमध्ये सुरू होईल. त्यासाठी आम्ही आणखी पाच शेतकऱ्यांची निवड केली आहे. त्यांनाही अशाच पद्धतीने सर्व अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. त्यातून अधिक चोख असे निष्कर्ष पुढे येतील अशी अपेक्षा आहे.’’

बॅटल अग्नेस्ट पॉवर्टी (बाप) असं या हिवतड प्रयोगाचे नामकरण आणि अंतिमतः प्रयोजन आहे. दुष्काळी भागासाठी शाश्‍वत पाणी दिले तर एकर शेतीतून एका कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकेल अशी शाश्‍वत पीक पद्धती शास्त्रशुद्धपणे मांडण्याची ही खटपट आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच शेतकऱ्यांची निवड केली असून, त्यांना आम्ही फक्त पाण्याची खात्रीची सोय करून देणार आहोत. त्याचे निष्कर्षही समाजासमोर मांडले जातील. या प्रयोगासाठीही समाजाकडून मदतीची अपेक्षा आहे.
- ॲड. संदेश पवार क्रांती स्मृतीवनचे कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com