यंदा डिसेंबरमध्येच द्राक्षे खायला मिळणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

सांगली - द्राक्ष बागांच्या फळछाटणीची धांदल सुरू आहे. गेल्या वर्षीच्या आगाप हंगामात मिळालेले दर डोळ्यांसमोर ठेवून छाटण्यांसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. यंदा परतीचा पाऊस पुढील आठवड्यात हजेरी लावेल, असा अंदाज आहे. असे असतानाही पावसात द्राक्षबागा छाटणीचा धोका पत्करला जातोय. आगाऊ छाटणीमुळे डिसेंबरच्या मध्यावर गोड, रसाळ द्राक्षे बाजारात दाखल होतील.

जिल्ह्यात मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुके द्राक्षबागा छाटणीसाठी शेतकऱ्यांची लगबग होती. हंगामासाठी महत्त्वाचा फळबहर, अर्थात छाटणी सुरू झाली आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस असल्याने यापूर्वी शेतकरी धाडस करीत नसत; पण गतवेळी आगाप छाटणीच्या द्राक्ष पेटीस (चार किलो) साडेचारशे ते पाचशे रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांना यंदा चांगल्या दराची भुरळ पडली आहे. पावसाची पर्वा न करता छाटणीचा धडाका सुरू आहे. छाटणीनंतर काड्यांना पेस्ट (डॉरमेक्‍स) मिश्रण चोळणे, झाडाला १८.०.४६, सुपर फॉस्फेट, सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा दिली जात आहे. मजुरांना खंडाने कामे दिली जात आहेत. ‘जीएसटी’मुळे खताचे काही प्रमाणात दर खाली आल्याने उत्पादकांना दिलासा आहे.

जिल्ह्यात एक लाख एकर द्राक्ष बागा बहरल्या. पंधरा दिवसांत सुमारे ४० हजार एकरांमध्ये छाटणी उरकली आहे. पावसाच्या संकटाचे ढग मात्र छाटणी झालेल्या बागांवर आहे. पोगा अवस्थेतील दावणी रोगाचा धोका संभवतो. तो रोखण्यास शेतकरी सज्ज आहेत. हंगामाअखेरीस बाजारभाव पडतात. व्यापारी फसवणूक करून पळून जाण्याचा धोक्‍यामुळे ५०-६० टक्के शेतकरी सप्टेंबरला छाटणीचे नियोजन करीत आहेत.

छाटणीला विलंब, भाव पडण्याचा धोका
गत हंगामाचा अनुभव पाहता आगाप छाटणीकडे बहुतांश शेतकऱ्यांचा कल आहे. एखाद्या शेतकऱ्याकडे चार एकर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. तीन एकरांवरील फळ छाटणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच घेतल्या आहेत. उर्वरित बागेची ऑक्‍टोबरमध्ये छाटण्याची तयारी आहे. पावसाचा धोका आहे. पण उशिरा छाटणी करून मातीमोल भाव मिळण्याचा धोका 
राहत नाही.