ई-चलनमुळे मूळ वाहनमालकाला नोटीस

ई-चलनमुळे मूळ वाहनमालकाला नोटीस

सांगली - वाहतूक नियम मोडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या वाहनधारकांना ई चलनद्वारे दंडाची नोटीस पाठवण्यात येत आहे. मात्र, ज्यांनी वाहनांची विक्री केली आहे, पण गाडीची कागदपत्रे मूळ मालकाच्या नावावरच आहेत, अशा वाहनांची नोटीस मूळ मालकाला जात आहे. त्यामुळे वाहन विक्री करताना गाड्यांची कागदपत्रे  क्‍लीअर करून घ्यावीत, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने केले आहे.

महापालिका क्षेत्रात विविध मार्गांवर ७९ सीसीटीव्ही  कॅमेरे बसविले आहेत. महत्त्वाच्या सिग्नलजवळ बसवलेल्या या कॅमेऱ्यांनी गेल्या पंधरवड्यात १७५ हून अधिक बेशिस्त वाहनधारकांना नियम मोडताना ‘टिपले’ आहे. त्यांना दंडात्मक कारवाईसाठी ई-चलन नोटिसा बजावल्या आहेत. गाडीच्या नंबरवरून मालकाच्या घरी नोटीस पाठवण्यात येते. 

सुमारे ३० हजारहून अधिक रुपयांचा दंड बेशिस्त वाहनधारकांकडून वसूल केला जाणार आहे. मात्र यामध्ये काही नोटिसा वाहनाची विक्री केलेल्या पण कागदोपत्री नाव न बदललेल्या मूळ मालकाला गेल्या आहेत. त्यामुळे नियम न मोडता दंड भरण्याची वेळ त्यांच्यावर आली.

मूळ मालकच दोषी
गेल्या पंधरवड्यात पाठवलेल्या ई चलन नोटिसांमध्ये काही वाहनांची विक्री झाल्याचे समोर आले. पण पोलिसांनी मूळ मालकालाच दोषी धरून त्यांना नोटीस सोपवली आणि दंड भरण्यास सांगितले. नाईलाजाने मालकांना दंड भरावा लागला. 

सॉफ्टवेअरमुळे माहिती
वाहतूक शाखेकडे सर्व वाहनांच्या नंबरचे सॉफ्टवेअर आहे. त्यावर नियम मोडणाऱ्या वाहनाचा नंबर टाकला की संबंधित वाहनाची संपूर्ण कुंडलीच समोर येते. यामध्ये वाहनाच्या इंजिनच्या चेसिस नंबरसह वाहन सध्या कुणाच्या नावावर आहे त्याचा पत्ताही येतो. त्यामुळे प्रत्यक्ष वाहनधारक कोण हे माहिती नसले तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आलेल्या वाहनाच्या नंबरवरून संपूर्ण माहिती घेऊन मालकाला नोटीस पाठवली जाते.

वाहनधारकांनी वाहन खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्यास ताबडतोब कागदपत्रावरही नवीन बदलाची नोंद करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा नियम मोडल्यावर मूळ मालकाला भुर्दंड बसतो. काही वेळा अपघात झाल्यासही न्यायालय कागपत्रांवरून मूळ मालकावर कारवाई करू शकते. बऱ्याच ठिकाणी ई चलन कारवाई होत असल्याने कागदपत्रे क्‍लीअर करून घ्यावीत.
- अतुल निकम,
सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com