थकबाकीपोटी कुंडल योजनेची वीज तोडली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

दुधोंडी - थकीत वीजबिलापोटी पंधरादिवसांत पुन्हा महावितरणने कुंडल प्रादेशिक योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने दुधोंडीसह संपूर्ण पलूस तालुक्‍यातील निम्म्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या योजनेची एकून दीड कोटी थकबाकी आहे. 14 गावांपैकी केवळ दोनच गावांनी थकीत पाणीपट्टी भरली आहे. अन्य 12 गावांनी पाणीपट्टी भरल्यानंतरच ही योजना चालू होणार असल्याचे महावितरण कंपनीतून सांगण्यात आले आहे. 

कुंडल प्रादेशिक नळ पाणी पुरवठा ही चौदा गावे आणि वाड्या वस्त्यांवर गेली चाळीसहून अधिक वर्षे पिण्याचा पाणी पुरवठा करीत आहे. या योजनेची पाईपलाईन अत्यंत जीर्ण झाली आहे. वरचेवर या पाईपलाईनला गळती लागत आहे. गळती लागली की त्वरित कर्मचाऱ्यांसह अधिकारी पाणी पुरवठा एक-दोन दिवस बंद ठेवून गळती काढतात व पाणी योजना त्वरित सुरू करतात. मात्र या योजनेचे महावितरणचे विद्युत बिल जवळपास दीड कोटी थकीत आहे. यात बऱ्यापैकी सर्वच ग्रामपंचायतींचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. 14 गावांपैकी पुणदी, सांडगेवाडी, दह्यारी या ग्रामपंचायती सोडण्यास दुधोंडीसह पलूस, रामानंदनगर सारख्या मोठ्या ग्रामपंचायतींही थकीतमध्ये आहेत. बऱ्यापैकी सर्वच ग्रामपंचायतींच्या थकबाकीमध्ये मोठी वाढ झाल्याने पाणी योजनेचा विद्युत पुरवठा तोडला आहे. गत महिन्यापूर्वी जवळपास बारा दिवस महावितरणने विद्युत थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला होता. त्यावेळीस जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन थकीत बिलांचे हप्ते करून भरण्याची परवानगी घेतली होती. महावितरणला पिण्याचे पाणी असणाऱ्या योजनांचा विद्युत पुरवठा खंडित केला जाऊ नये अशा सूचनाही दिल्या होत्या. मात्र महावितरणने मंत्र्यांच्या आदेश धुडकावत योजनांची वीज तोडली आहे. 

महिन्याभरात दुसऱ्यांदा या योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर पंचायत समितीने व पाणीपुरवठा विभागाचे प्रत्येक ग्रामपंचायतीस थकीत पाणीपट्टी भरण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. या नोटिसांमुळे 14 पैकी 3 ग्रामपंचायतींने या नोटिसाला प्रतिसाद दिला आहे. 

कूपनलिका खोदाईचे प्रमाण वाढले 
कुंडल प्रादेशिक योजना वरचेवर बंद पडत असल्याने नागरिकांची स्वत:च्या घराजवळ कूपनलिका खोदण्यास सुरवात केली आहे. खोदाईचे प्रमाण वाढले असल्याचे सध्या परिसरात दिसून येत आहे.