‘स्वाईन फ्लू’साठी यंत्रणा सक्षम करा - महापौर शिकलगार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

सांगली - ‘‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णांची संख्या शहरात वाढत आहे. गेल्या चार महिन्यांत तीन जणांचे बळी गेले आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करा,’’ असे आदेश महापौर हारुण शिकलगार यांनी आज दिले. आरोग्य विभागाची आज ‘स्वाईन फ्लू’बाबत आढावा बैठक झाली. यावेळी उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील, डॉ. कवठेकर, डॉ. रोहिणी कुलकर्णी, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह औषध फवारणी कर्मचारी बैठकीला उपस्थित होते. 

महापालिका क्षेत्रात १ एप्रिल ते आजअखेर एकूण २० संशयित रुग्ण दाखल झाले. त्यांचे ‘स्वॅब’चे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी १३ जणांच्या अहवालात स्वाईन फ्लू ‘पॉझिटिव्ह’ आला. सहा जणांचे निगेटिव्ह, तर एकाचा अहवाल अद्याप आला नाही. २० पैकी १६ रुग्ण बरे झाले असून तिघांचा मृत्यू झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाने महापौर यांच्यासमोर ठेवला. त्यानंतर महापौरांनी यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच सर्वाजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्याचे आदेश दिले. तसेच दहा हेल्थपोस्टवर शासनाकडून औषधे मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालय व भारती हॉस्पिटलमध्ये रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आल्याचेही त्यांनी सांगितले. 

पाच वर्षांत २६ जणांचे बळी 
महापालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षात ‘स्वाईन फ्लू’ने २६ जणांचे बळी गेले आहेत. त्यात ९८ जणांचे अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आले होते. यंदाच्या वर्षी ‘स्वाईन’वर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सक्षम असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

तसेच औषध फवारणीसाठी नवे औषधही तातडीने खरेदी करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. 

खासगी डॉक्‍टरांनी अहवाल द्यावा - जिल्हाधिकारी
खासगी डॉक्‍टरांनी आपल्याकडे स्वाईन फ्लूच्या रुग्णांबाबतचा अहवाल तातडीने जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे पाठवावा, असे आदेश जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी दिले आहेत. याबाबतचे पत्र इंडियन मेडिकल असोसिएशनला देण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की खासगी डॉक्‍टरांनी स्वाईन फ्लूचे निदान करण्यात दिरंगाई करू नये. संशयित रुग्णांच्या ‘स्वॅब’चे नुमने पाठवल्यानंतर प्राप्त झालेला अहवाल तातडीने जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे द्यावा.

हेल्थ पोस्ट 
सांगली- गाडगीळ प्लॉट सांगलीवाडी, जुना बुधगाव रोड आयएमए हॉल, वडर कॉलनी, शिवाजीनगर, मनपा शाळा क्रमांक ६, रमामातानगर, मनपा शाळा क्रमांक ६ विश्रामबाग, 
मिरज - लक्ष्मी मार्केट, मिरज अर्बन, संजय गांधी झोपडपट्टी, उर्दू शाळा, 
कुपवाड - अभयनगर बस स्टॉपजवळ