मिरज... बकालीकरणाकडे...

मिरज... बकालीकरणाकडे...

मिरज - एरवी सांगलीतील अतिक्रमणांची नेहमीच चर्चा होत असते. मात्र मिरज शहरातील एक रस्ता आणि गल्लीही अतिक्रमणांच्या विळख्यातून सुटलेली नाही. संस्थानिक नगरसेवकांच्या आशीर्वादानेच शहराची अवस्था बकालीकरणातून बकालीकरणाकडे सुरू आहे. सारे शहर खड्ड्यांनी व्यापले असून दहा-दहा वर्षे रस्त्यांची रुंदीकरणे कामे रखडली आहेत. महापालिकेचा भाग असूनही आयुक्तांसह महत्त्वाचे अधिकारी इकडे अपवादानेच दिसतात. जे नगरसेवकांचे, तेच इथल्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांचे. तेही मिरजेचे संस्थानिकच आहेत. सर्वसामान्य मात्र मूलभूत सुविधा आणि छोट्या छोट्या कामांसाठीही नाडवले जात आहेत. 

शहराचा मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी रस्त्याचे रुंदीकरण दहा वर्षांनंतरही अपूर्णच आहे. गेल्या दहा वर्षांत अवघ्या दीड किलोमीटरच्या रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण झालेले नाही.

विजेचे खांब हटवणे  आणि खासगी जागा ताब्यात हटवण्यातच वर्षे लोटली आहेत. खुद्द पंचायत समितीसारख्या शासकीय कार्यालयाची जागा ताब्यात घ्यायलाही प्रशासनाला जमत नाही. यावरून इथल्या विकास कामांच्या गतीचा अंदाज यावा. ही या रस्त्याची तऱ्हा तर अंतर्गत भागातील ब्राह्मणपुरी, मंगळवार पेठ, गुरुवार पेठांचे विकास आराखड्यानुसारचे रुंदीकरण स्वप्नवतच. वर्षांनुवर्षे हे रस्ते कागदावरच आहेत. गांधी पुतळा ते शनिमारुती मंदिर या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नोटिसाही बजावून वर्षे लोटली. त्यावर पुढे कार्यवाही शून्य. सध्या या रस्त्याची रुंदीच मुळी अनेक ठिकाणी अवघी दहा-पंधरा फूट इतकी उरली आहे.

गुरुवार पेठेची अवस्था त्याहून वाईट. अनिर्बंध पार्किंग, बेकायदा बांधकामे यामुळे येथे दिवसभर वाहनांची कोंडी असते. त्यातूनच महापालिकेचे आणि पोलिस अधिकारी जात असतात. त्यांना या साऱ्या असुविधांची शरम वाटत नाही. इथल्या व्यावसायिकांनी पार्किंगची नियमावलीच नव्हे तर पालिकेच्या अस्तित्वालाच धुडकावून लावले आहे. ब्राह्मणपुरीतील मंगल कार्यालय गल्लीचा वाद न्यायालयात आहे. आधीच पालिकेला उल्हास त्यात न्यायालयाचा हातभार. त्यामुळे न्यायप्रविष्ट बाब म्हणून तिकडे पालिकेचे अधिकारी स्वप्नातही फिरकत नाहीत. किमान अस्तित्वातील रस्तेही मोकळे करण्याचे धैर्य अधिकाऱ्यांच्यात नाही.

पालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग नेमके करतो काय असा प्रश्‍न पडावा. शहरात या विभागाची वाहने किंवा कर्मचारीही दिसत नाहीत. पाट्या टाकण्यापलीकडे काहीच होत नाही. बसस्थानक, रेल्वेस्थानक, दर्गा ते शहर बसस्थानक या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे माजली आहेत. मिरजेत एखादा पर्यंटक आलाच तर मीरासाहेब दर्ग्याच्या भेटीसाठी येतो. हा संपूर्ण परिसर अतिक्रमणांनी व्यापला आहे. तिथल्या प्रशस्त आवाराचे नामोनिशानही फेरीवाल्यांनी शिल्लक ठेवलेले नाही.  इथली अस्वच्छता तर किळस आणणारी. मिरजेचे ‘असे’ दर्शन मान खाली घालायला लावणारे. सर्वधर्मीय लोक श्रद्धेने इथे येतात. त्यांच्यासाठी किमान सुविधा राहोत स्वच्छ परिसर तरी द्यायची जबाबदारी पालिका घेत नाही. 

शहरात रस्तेच अस्तित्वहीन होत असल्याने त्यांच्या अवस्थेविषयी वेगळे ते काय असणार? बघू तिकडे खड्डेच खड्डे. मिरजेची ही ओळख गेल्या कैक वर्षांपासूनची. कारभारी सारा पैसा नेमका कोठे खर्च करतात हाच संशोधनाचा विषय. रेल्वे स्टेशन ते वंटमुरे कॉर्नर, किंवा एसटी स्थानक परिसर हा गेल्या कैक पिढ्यांपासून खड्डयातच आहे. इथे फक्त धूळ आणि धुळीचेच साम्राज्य असते. एसटी स्थानक चौकातील यशवंतराव चव्हाण आणि करीम खाँसाहेबांचे पुतळे मूळ रंगात दिसून अनेक वर्षे लोटली आहेत. महात्मा फुले चौक ते बसस्थानकमार्गे शिवाजी क्रीडांगण या रस्त्याची अवस्था दयनीय. बंद सिग्नलमुळे अस्ताव्यस्त वाहतूक, रस्ते खोदाईमुळे धुळीचे लोट, फेरीवाल्यांची अतिक्रमणे, अकार्यक्षम महापालिका, मंडईअभावी गल्लोगल्ली रस्त्यातच भरणारे बाजार अशी अनागोंदी मिरजेच्या पाचवीलाच पूजली आहे. विद्यमान आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या काळातही मागील पानावरून पुढे  अशीच अवस्था आहे.
 

शहराची अवस्था खेड्यापेक्षा वाईट आहे. मिरज प्राचीन शहर. त्याची अवस्था आदिम काळाप्रमाणेच आहे. फक्त खासगी मालमत्तांमधील बदल हाच काय तो बदल. पालिका या शहरात अस्तित्वात आहे असं म्हणणेच धाडसाचे. रस्ते, स्वच्छता आणि सार्वजनिक दिवे हे मुख्य प्रश्‍न आहेत. महापालिकेत कर्मचारी भेटला तरच आश्‍चर्य.  
- जाफर नूरमहंमद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com