अभियंत्याच्या निलंबनाची शिफारस; एकाची बदली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मिरज - जलयुक्त कामाच्या आढाव्यासाठी मिरज उपविभागातील तीन तालुक्‍यांची मॅरेथॉन आढावा बैठक आज येथे झाली. जिल्हाधिकारी विजय काळम यांनी शासकीय विश्रामगृहात विभागनिहाय झाडाझडती घेतली. काम समाधानकारक नसल्याने लघू पाटबंधारे विभागातील अभियंत्याच्या निलंबनासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारशीचे आदेश दिले. मिरजेतील एका शाखा अभियंत्यांच्या बदलीचे आदेश दिले. एका अभियंत्याचे निवृत्तीवेतन रोखण्याचा इशारा दिला. चार तास चाललेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. 

जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश खाडे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेतील कामांबाबत मिरज तालुक्‍यातून सातत्याने तक्रारी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आजच्या बैठकीत खूपच गरमागरमी झाली. जिल्हाधिकाऱ्यांसह अतिरिक्त जिल्हाधिकारी, प्रांत, तीनही तहसीलदार, गटविकास अधिकारी, जलसंधारण, वन व सामाजिक वनीकरण, कृषी, लघुसिंचन, पाटबंधारे, छोटे पाटबंधारे आदी डझनभर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कामे समाधानकारक न झालेल्या विभागांवर जिल्हाधिकारी भडकले. लघुसिंचन विभागाच्या अभियंत्याचे काम समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले. तीन तालुक्‍यांत एकही काम सुरू नसल्याचे पाहून ते संतापले. त्यांच्या निलंबनासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्याचे आदेश दिले. तशी नोंद बैठकीच्या इतिवृत्तात घेण्यात आली. छोटे पाटबंधारे विभागाच्या दोघा अभियंत्यांतील चकमक जिल्हाधिकाऱ्यांसमोर झाली. उपविभागात सर्वाधिक तक्रारी मिरज तालुक्‍यातून येत आहेत. त्याला हे अधिकारी जबाबदार असल्याची तक्रार प्रांतांनी केली. त्यावेळी या अभियंत्याने माझे काम चोख आहे, असा दावा केला. कार्यालयातील सहकारी अभियंत्याकडून पत्रकार आणि पुढाऱ्यांना माहिती पुरवली जात असल्याने तक्रारी व बदनामी सुरू  असल्याचाही दावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी सहकारी अभियंत्याला खुलासा विचारला. त्यांनी सांगितले, की सहकाऱ्यांकडून चुकीच्या कामासाठी दबाव आणला जातो. कानडवाडीत चुकीचे काम झाले असतानाही ते सुरू ठेवण्यासाठी दबाव आणला. चुकीची फाईल तयार करण्यासाठी दबाव आणला. 

जिल्हाधिकाऱ्यांनी एकाला पेन्शन रोखण्याचा इशारा दिला. दुसऱ्याच्या त्वरित बदलीचे आदेश दिले. सामाजिक वनीकरण विभागाने निधी मिळाला नसल्याचा दावा केला. त्यावेळी जिल्हाधिकारी भडकले. वनविभागाच्या वरिष्ठांनाही असमाधानकारक कामाबद्दल फैलावर घेतले. 

आयुक्‍तांचा दौरा
दरम्यान, जलसंधारण आयुक्त एकनाथ डवले शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते देखील जिल्ह्यातील कामांचा आढावा घेणार आहेत. जलयुक्त शिवार मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असतानाही मोठा निधी परत गेल्याने वातावरण गरम झाले आहे.

Web Title: sangli news engineer suspend transfer