सांगली जिल्ह्यात वर्षभरात १९१ जणांना दृष्टिदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

सांगली - जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४१० बुबळांचे दान झाले. त्यातून झालेल्या शस्त्रक्रियांद्वारे १९१ जणांना दृष्टी मिळाली आहे. म्हणजे सुमारे २०५ जणांचे नेत्रदान झाले, जे जिल्ह्याची गरज विचारात घेता पुरेसे नाही. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत किमान सहाशेंवर जणांची नेत्र शस्त्रक्रियेसाठीची प्रतीक्षा यादी आहे.

सांगली - जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४१० बुबळांचे दान झाले. त्यातून झालेल्या शस्त्रक्रियांद्वारे १९१ जणांना दृष्टी मिळाली आहे. म्हणजे सुमारे २०५ जणांचे नेत्रदान झाले, जे जिल्ह्याची गरज विचारात घेता पुरेसे नाही. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत किमान सहाशेंवर जणांची नेत्र शस्त्रक्रियेसाठीची प्रतीक्षा यादी आहे. तथापि, पुरेशी बुबळे मिळत नसल्याने या रुग्णांना दोन ते पाच महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. त्यातल्या त्यात एक चांगली बाब म्हणजे गेल्या काही वर्षांत नेत्रदानासाठी समाजाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

सांगलीत नेत्रसेवा फाऊंडेशन, लायन्स नॅब, श्री. टेके आय केअर, नयनदीप नेत्रालय, नंदादीप आय हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, मिरज वैद्यकीय महाविद्यालय, वसंतदादा सिव्हिल रुग्णालय, स्वामी स्वरुपानंद नेत्रालय अशा नऊ ठिकाणी नेत्रदानाची सोय आहे. कोणत्याही वयातील व्यक्तीचे मृत्यूनंतर नेत्रदान होऊ शकते. त्यासाठी त्यांनी मृत्यूपूर्वी नेत्रदानाचा अर्ज भरला असलाच पाहिजे अशीही अट नाही. त्याच्या कुटुंबीयांच्या संमतीनेच नेत्रदान केले जाते. मानव सेवा म्हणून या चळवळीच्या मागे समाजाने उभे राहिले पाहिजे. 

‘जिल्ह्यात वर्षाकाठी सुमारे अडीच ते तीन हजार मृत्यू होतात. म्हणजे किमान पाच ते सहा हजार बुबळाचे दान होऊ शकते. मात्र विविध गैरसमजांमुळे नेत्रदानासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. नेत्रदानातून अनेकांचे आयुष्य उजळवण्याची मृत्यूपश्‍चात पुण्यकार्याची संधी आहे. ’’
अविनाश शिंदे,
समुपदेशक, वसंतदादा रुग्णालय नेत्रपेढी

‘‘नैसर्गिक मृत्यूपेक्षाही जेव्हा अपघात किंवा आत्महत्येमुळे जेव्हा मृत्यू होतो तेव्हा नेत्रदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. अशा बुबळ रोपणाचे अधिक चांगले परिणाम येतात. अशा प्रसंग प्रत्येक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. तरीही आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्तित्व मृत्यूनंतरही कायम ठेवण्यासाठी या पुण्यकार्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी.’’
डॉ. मिलिंद किल्लेदार,
नेत्र शल्य चिकित्सक व नेत्रोपचार तज्ज्ञ

‘‘आमच्या नेत्रपेढीकडे वर्षभरात १०४ बुबळांचे दान झाले. त्यापैकी विविध वैद्यकीय कारणास्तव ३७ बुबळांचा वापर झाला नाही. वैद्यकीय प्रशिक्षणाचा भाग म्हणूनही बुबळांचा वापर होत असतो. या सर्व बाबी विचारात घेता नेत्रदानाची संख्या वाढली पाहिजे.’’
शरणाप्पा रेवतगावकर

समुपदेशक, नेत्रसेवा फौऊंडेशन

नेत्रदानाला जात, पंथ, धर्माच्या या सेवेला सीमा नाहीत. कोणीही डॉक्‍टर त्या चौकटी पाहून कुणावर उपचार करीत नसतो. तथापि, मुस्लिम समाजातून होणारे नेत्रदान खूपच नगण्य आहे. मुस्लिम धर्मानेही मानव सेवेला महत्त्व दिले आहे. गैरसमज फेकून अन्य समाजाच्या बरोबरीने मुस्लिमांनीही या चळवळीचा भाग झाले पाहिजे.
- डॉ. अमिर कादरी,
नेत्रशल्य चिकित्सक व बुबुळ तज्ज्ञ
मिरज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, मिरज.

Web Title: Sangli News Eye donation special report