रास्तारोको, पुतळा दहन, निदर्शने 

रास्तारोको, पुतळा दहन, निदर्शने 

सांगली - शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील गावागावांत आज कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व बाजारपेठांसह दूध संकलन बंद ठेवण्यात आले. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लोकांना "बंद'चे आवाहन केले. 

सावळज - सर्व ग्रामस्थ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसह व्यापाऱ्यांनी "बंद'मध्ये सहभाग घेतला. सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. दूध संकलन बंद होते. सरकारविरोधात निषेध फेरी निघाली. श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर सांगता झाली. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत पाटील, किशोर उनउने, राजू सावंत, नदीम तांबोळी आदी उपस्थित होते. 

झरे  - झरे (ता. आटपाडी) येथील आठवडा बाजार तुरळक भरला. वाहने बंदचा परिणाम झाला. भाज्यांचे आवक खूप कमी होती. 

कवठेएकंद : गाव बंद ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी फेरी काढली. शेकाप, राष्ट्रवादीने जुनी चावडी येथून फेरी काढली. शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढणाऱ्यांचा निषेध केला. रामचंद्र थोरात, अशोक घाईल, सूर्यकांत पाटील, प्रा. बाबूराव लगारे, विठ्ठल कुंभार, डॉ. नरेंद्र खाडे आदींची भाषणे झाली. 

कवठेमहांकाळला प्रचंड प्रतिसाद 
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्‍यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शिरढोण, लांडगेवाडी, कुची येथे रास्तारोको केला. सकाळी लांडगेवाडी बसस्थानकजवळ शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. टायर पेटवून रास्तारोको केला. एक तास मिरज-पंढरपूर रस्ता अडवला. सुमारे दहा किलोमीटर वाहनांची रांग लागली. शिरढोण येथे शेतकरी संघटना, मनसे, मराठा स्वराज्य संघ, भारतीय किसन सभा, समता परिषद व शेतकरी यांनी आंदोलन केले. आठवडा बाजार बंद राहिले. अग्रण धुळगावातील दूध संस्थेचे शेतकऱ्यांनी दूध ओतले. राज्य मार्गावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जयाजी सूर्यवंशी यांच्या पुतळ्याचे दहन केले. 

डिग्रजमध्ये पुतळा दहन 
तुंग : मिरज पश्‍चिम भागात कडाकडीत बंद होता. मौजे डिग्रज, तुंग, कसबेडिग्रज, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी गावांतील शेतकरी रस्त्यावर उतरले. मौजे डिग्रजमध्ये मुख्यमंत्री व सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. स्वाभिमानी, जोशी प्रणीत शेतकरी संघटना सहभागी झाली. दुधगाव, सावळवाडी, माळवाडी मध्ये दूधसंकलन पूर्ण बंद ठेवण्यात आले. 

कुंडलमध्ये क्रांती फेरी 
कुंडल : बाजारपेठेमधून शेतकरी क्रांती प्रचार फेरी निघाली. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामचंद्र लाड, कॉ. सुभाष पवार, ऍड. दीपक लाड, रामचंद्र लाड, वैभव पवार, वसंतराव धर्माधिकारी, डॉ. उदय लाड, अक्षय गायकवाड, पपू शिंदे, सचिन हात्तीकर सूरज शिंदे, विश्वजित लाड, ऋषी रावळ, सौरभ हेगडे सहभागी झाले. "क्रांती'चे नेते अरुण लाड, श्रीकांत लाड, सर्जेराव पवार यांनी रविवारचा अठवडा बाजार "बंद'चे आवाहन केले, शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. 

अलकूड फाटा अडवला 
रांजणी - रांजणी, अग्रण धुळगाव बंद होते. सकाळी अलकूड (एस) फाट्यावर शेतकऱ्यांनी "रास्ता रोको' केले. जत-सांगली रस्त्यावर चारीही दिशेची वाहने रोखली. मोठ्या रांगा लागल्या. शेतकऱ्यांनी दुधाच्या किटल्या ओळीने रस्त्यावर ठेवून रस्ता बंद केला. संभाजी पवार, शंकर भोसले, अरुण भोसले, नेताजी पवार, संजय भोसले, डॉ. अनिल भोसले आदी उपस्थित होते. 

दुधोंडीत बंद 
दुधोंडी - दुधोंडी बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. रविवारी रात्री कार्यकर्त्यांनी फिरून "बंद'चे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद मिळाला. 

सोनहिरा परिसर  कडकडीत बंद 
देवराष्ट्रे - सोनहिरा परिसरात कडकडीत बंद पाळला. देवराष्ट्रे, मोहिते वडगाव, चिंचणी, शिरसगाव, अंबक, आसद येथील दूध संकलन बंद होते. दूध मोफत वाटले. अंबक येथे रस्ता रोको करण्यात आला. मागण्यांचे निवेदन तलाठी श्री. लांडगे यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com