अन्नदात्यासाठी "शटरडाऊन' 

अन्नदात्यासाठी "शटरडाऊन' 

सांगली  - कोणत्याही पक्ष, संघटनेचे नेतृत्व नसताना "एक दिवस अन्नदात्यासाठी' या आवाहनाला प्रतिसाद देत आज शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. सांगली, मिरज, विटा, इस्लामपूर, तासगाव या प्रमुख शहरांसह जिल्हाभरात व्यवहार बंद ठेवून शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यात आला. भाजप वगळता अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांनी फेरी काढून "बंद'चे आवाहन केले. सायंकाळनंतर काही ठिकाणी व्यवहार सुरू झाले, मात्र दिवसभर "अन्नदात्यासाठी शटरडाऊन' राहिला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सर्वपक्ष नेत्यांनी आज स्टेशन चौकात जमण्याचे आवाहन केले होते. त्याला भाजप वगळता सर्व पक्षांच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू नका, शेतमालाला हमीभाव द्या, अशा प्रमुख मागण्यांसाठी 1 जूनपासून शेतकरी संपावर आहेत. दोन दिवसांपूर्वी संप मिटवण्याबाबतच्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, मनसे, भाकप, माकपसह सर्वांनीच संप सुरूच राहील, अशी घोषणा केली. त्यातून आज "महाराष्ट्र बंद'चे आवाहन करण्यात आले होते. त्यात शहरी जनतेनेही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आम्हीही बळीराजाच्या पाठीशी आहोत, हे दाखवून दिले. 

मुख्य पेठांतून फेरी 
येथील स्टेशन चौकात सकाळी 11 वाजता सर्वपक्षांचे नेते, कार्यकर्ते एकत्र जमले. व्यापाऱ्यांना "बंद'चे आवाहन करत मोटारसायकल फेरी निघाली. ती स्टेशन चौकातून राजवाडा, कापडपेठ, सराफ कट्टा, गणपती पेठ, हरभर रोड, मारुती रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सिव्हिल रोड, राम मंदिर चौक, कॉंग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी निघाली. राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देतानाच "कर्जमाफी झालीच पाहिजे', असा आवाज घुमला. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. 

भाजप वगळता सारे 
सत्ताधारी भाजपचा अपवाद वगळता सर्वपक्षांनी या फेरीत सहभाग घेतला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, मापक, भाकपसह विविध संघटनांनी फेरीत सहभाग घेतला. माजी आमदार नितीन शिंदे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माकपचे उमेश देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, स्वाभिमानी आघाडीचे सतीश साखळकर, ऍड. अजित सूर्यवंशी, सुधार समितीचे ऍड. अमित सिंदे, कॉंग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील, डॉ. संजय पाटील, हमाल नेते विकास मगदूम, बाळासाहेब बंडगर, अश्रफ वानकर, राष्ट्रवादीच्या छायाताई जाधव, एसटी कामगार नेते बिराज साळुंखे, जनार्दन गोंधळी, प्रियानंद कांबळे, अमर पडळकर आदींनी सहभाग घेतला. 

कार्यकर्त्यांना नोटिसा 
सांगली शहर पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना जमाव बंदीच्या नोटिसा बजावल्या. त्यात रॅलीला बंदी घालण्यात आली. स्टेशन चौकात निदर्शने करा, मग पाच जणांनी जाऊन निवेदने द्या, कलम 37 (1) लावले आहे, अशा नोटिसा देण्यात आल्या. तो आदेश मोडून निदर्शने करण्यात आली. दडपशाहीचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या. थेट मैदानात उतरून दुकाने बंद केली. 

दिवसभरात ठळक 
भाजीपाला व्यवहार ठप्प 
शेतमालाची निर्यात थांबली 
दूध संकलन पूर्णपणे बंद 
सकाळपासूनच शटरडाऊन 
दहापासून ठिकाठिकाणी रास्तारोको 
सांगलीत अकरा वाजता सर्वपक्ष फेरी 
दुकाने बंद करण्याचे आवाहन 
काही ठिकाणी स्वतः शटर ओढले 
निदर्शने, फेऱ्या, पुतळा दहन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com