सांगलीः वाळव्यात द्राक्षबागायतदार शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

कर्जामुळे नैराश्‍य : संबधीत शेतकरी पतसंस्थेचा अध्यक्ष

वाळवा (सांगली): द्राक्षबागेला घेतलेले कर्ज फेडणे शक्‍य नसल्याच्या नैराश्‍येतून गुरुवारी (ता. 14) येथे शेतकऱ्याने गळफासाने आत्महत्या केली. जगन्नाथ महादेव शेटे (वय 50) असे त्यांचे नाव आहे. प्रतिथयश महात्मा बसवेश्‍वर नागरी पतसंस्थेचे ते अध्यक्ष होते. या प्रकरणी आष्टा पोलिसात नोंद आहे. मात्र, श्री. शेटे यांचे कर्ज किती होते याची नोंद पोलिसात नाही.

गुरुवारी रात्री वाळवा-बावची रस्त्याला ही घटना घडली. पहाटे शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. या रस्त्याला कै. शेटे यांची आठ एकर बागायत जमीन आहे. त्यात द्राक्ष व ऊस शेती आहे. बहुतांशी शेती इतरांना कसायला दिली आहे. काल दिवसभर कै. शेटे आपल्या कामात व्यस्त होते. दुपारी त्यांनी एका मित्राला दुचाकी गाडीचा व्यवहारही करुन दिला. त्यानंतर पाचच्या सुमारास ते शेतात गेले. तसा निरोपही त्यांनी घरी दिला. वास्तविक कधीही ते एवढ्या उशिरा शेतात गेले नव्हते. शेतात गेल्यानंतर बराच उशिर झाला तरी ते परत आले नाहीत म्हणून त्यांच्या मोबाईलवर पत्नीने वारंवार कॉल केला. प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यानंतर शेत कसणाऱ्यांना त्यांनी फोन केला. कसणारा शेतकरी शोध घेत शेतातील शेडमध्ये पोहचला. त्याठिकाणी जगन्नाथ शेटे लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

कै. शेटे यांची जमीन गावापासून दूर आहे. त्यामुळे कायदेशीर सोपस्कार पूर्ण व्हायला बराच वेळ लागला. बसवेश्‍वर विश्‍वनाथ शेटे यांनी आष्टा पोलिसात फिर्याद दिली. हवलदार ए. यु. भिसे तपास करीत आहेत. कै. शेटे यांचे कुटुंब चौकोनी आहे. पत्नी, मुलगा, मुलगी असा त्यांचा परिवार आहे. मुलगा पुणे येथे शेतीशास्त्राच्या शेवटच्या वर्षाला आहे. तर मुलगी गावातच महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. अतिशय शांत व मैत्रीपूर्ण स्वभावाचे कै. शेटे पेठभागासह परिसरात मामा म्हणून परिचित होते. त्यांच्या आत्महत्येमुळे गावात खळबळ उडाली आहे.

Web Title: sangli news farmer suicide in walwa tehsil