शेतकरी मृत्यूचा अहवाल सदाभाऊ खोतांनी मागविला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

सांगली - मल्लेवाडी (ता. मिरज) येथील द्राक्ष बागायतदार दादासाहेब तात्यासाहेब चौगुले (वय ३८)  या शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी अहवाल द्या, असे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा कृषी विभागाला दिले आहेत. इस्लामपूर येथे कृषी अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. 

द्राक्ष बागेवर आलेल्या दावण्या रोगावर औषध फवारणी करताना  चौगुले यांना चक्कर आली. त्यात ते कोसळले. रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.  शवविच्छेदन अहवालानुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. हे  प्रकरण संवेदनशील आहे. यवतमाळला दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने कृषी विभागात आधीच खळबळ उडाली आहे. त्यात मल्लेवाडीतील दुर्घटनेमुळे हा विभाग खडबडून जागा झाला आहे. 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले,‘‘या प्रकरणी मी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. दुर्घटनेबाबत अहवाल मागवला आहे. त्यातून जी माहिती येईल त्याआधारे पुढील कार्यवाही केली जाईल. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत.’’